अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
एमआयडीसी परिसरात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाला आहेत. धक्कादायक म्हणजे या टोळ्यांमध्ये आता कुरघोड्या सुरू झाल्या असून त्यातून मारहाण करून धिंड काढणे, धारदार शस्त्राने हल्ला करून खुनाचा प्रयत्न करणे, अपहरण करून अमानुष मारहाण करत मृतदेह जाळून टाकण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या आठवड्यात तपोवन रस्त्यावरून अपहरण केलेल्या युवकाची हत्याही याच टोळी युध्दातून झाली आहे. दरम्यान, दोन टोळ्यांत हा सर्व प्रकार होत असताना त्याला रोखण्यात एमआयडीसी पोलीस अपयशी ठरले आहेत.
एमआयडीसी परिसरात वास्तव्यास असलेला व ‘भोर्या’ नावाने आपली ओळख निर्माण केलेल्या एका अल्पवयीन मुलाने आपली टोळी तयार केली आहे. या टोळीत अनेक अल्पवयीन मुले देखील सहभागी आहेत. तर दुसरीकडे राहुल पाटील, महेश पाटील या बंधूंनी आपली टोळी तयार केली आहे. या दोन टोळीत जून 2024 पासून खटके उडण्यास सुरूवात झाली. याला कारण ठरले एक ऑडिओ क्लीप, त्या क्लीपमध्ये राहुल पाटील याला मारण्याची सुपारी दिल्याचा उल्लेख होता. त्याचा जाब विचारणार्या राहुल पाटील याला मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून भोर्या टोळीतील अल्पवयीन मुलांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र राहुल पाटील व त्याच्या पंटरने या ऑडिओ क्लीपचा बदला भोर्याच्या टोळीतील दोघा अल्पवयीन मुलांची धिंड काढून घेतला. त्या अल्पवयीन मुलांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली होती.
हा गंभीर प्रकार घडून देखील एमआयडीसी पोलिसांनी सुरूवातीला गुन्हा दाखल केला नव्हता. मारहाण आणि धिंड काढल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी राहुल पाटील व त्याच्या पंटरवर गुन्हा दाखल केला व त्यांना अटक केली होती. त्या गुन्ह्यात अपहरण, पोक्सोचे वाढीव कलम देखील लावण्यात आले होते. दरम्यान, राहुल पाटील याच्यासह त्याचे पंटर जेलमध्ये असल्याने काही काळासाठी हा वाद थांबला. मात्र पाटील टोळी जेलमधून सुटल्यानंतर भोर्याच्या टोळीनं पाटील टोळीतील अनिकेत ऊर्फ लपक्या विजय सोमवंशी याच्यावर शस्त्राने खुनी हल्ला करून त्याला जखमी केले. ही घटना जानेवारी 2025 मध्ये घडली. या प्रकरणी सोमवंशीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भोर्या टोळीतील पंटरवर खुनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा देखील नोंदविण्यात आला होता. गुन्हा दाखल होऊन देखील एमआयडीसी पोलिसांनी त्यातील संशयितांना अटक केली नव्हती.
दरम्यान, लपक्यावर खुनी हल्ला करणार्या भोर्या व त्याच्या टोळीचा बदला घेण्याचा प्लॅन पाटील टोळीने आखला. त्यानुसार सुरूवातीला 21 फेब्रुवारी रोजी भोर्याच्या टोळीतील संदेश भागाजी वाळूंज उर्फ गट्या याचे अपहरण करण्यात आले. त्याच्या मदतीने वैभव शिवाजी नायकोडी (वय 19, रा. ढवणवस्ती, तपोवन रस्ता) याला 22 फेब्रुवारी रोजी उचलले. त्या दोघांना अमानुष मारहाण करण्यात आली. यात वैभव नायकोडी हा मयत झाला. तो मयत होताच संदेश वाळुंज उर्फ गट्या याला लपक्या व त्याच्या साथीदारांनी सोडून दिले. मयत वैभवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याचा मृतदेह विळद परिसरातील केकताई डोंगरामध्ये लाकूड व डिझेल टाकून जाळला. वैभवच्या मृत्यूप्रकरणी तोफखाना व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नऊजणांना अटक केली असून ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
मारहाण अन् खंडणीची मागणी
मयत वैभव नायकोडी याचे अपहरण करण्यापूर्वी लपक्या व त्याच्या साथीदारांनी संदेश वाळूंज उर्फ गट्या याचे 21 फेब्रुवारी रोजी अपहरण केले होते. त्याला अमानुष मारहाण करून त्याच्याकडे 50 हजार रूपयांची खंडणी मागितली. हा सर्व प्रकार संदेश उर्फ गट्या याने सोमवारी (3 मार्च) एमआयडीसी पोलिसांना सांगितला. पोलिसांनी अपहरण, मारहाण, खंडणी आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. अनिकेत उर्फ लपका सोमवंशी, नितीन नन्नवरे, महेश पाटील, सॅम उर्फ सुमित थोरात, करण शिंदे, विशाल कापरे, रोहित गोसावी आणि सोनु घोडके यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तडीपार, मोक्का कारवाईकडे दुर्लक्ष
पाटील टोळीतील महेश पाटील याच्यासह अनिकेत ऊर्फ लपक्या सोमवंशी, सुमित थोरात, निशिकांत उर्फ नितीन नन्नवरे, विशाल कापरे, करण शिंदे यांच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, चोरी, हाणामारी, आर्म अॅक्ट, दारू विक्री सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन टोळ्यांत वाद सुरू असताना व संशयित आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल असताना देखील एमआयडीसी पोलिसांनी त्यांच्यावर तडीपार, मोक्का कायद्यान्वये कारवाई केली नाही.
धोत्रे टोळी सक्रिय
संतोष रघुनाथ धोत्रे याच्यावर ‘एमपीडीए’ लावण्यात आला होता. मात्र त्याने तो रद्द करून घेतला. दरम्यान, एमपीडीए रद्द होताच तो व त्याची टोळी देखील एमआयडीसी परिसरात सक्रिय झाली आहे. त्या टोळीने रविवारी सायंकाळी निंबळक येथील राजेंद्र कोतकर यांच्यासह कुटुंबावर खुनी हल्ला केला आहे. धोत्रे टोळीनं डोकं वर काढल्याने एमआयडीसीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोशल मीडियावर खुन्नस
सोशल मीडियावर या टोळ्यांमध्ये वाद सुरू असून, एकमेकांच्या विरोधात पोस्ट आणि रील्स शेअर करून खुन्नस दिली जात आहे. एमआयडीसी पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष केले असल्याने, टोळ्यांची हिंमत वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी वैभव नायकोडी याला अमानुष मारहाण करून खून केला व त्याचा मृतदेह जाळून टाकण्याचे धाडस दाखविले.