राहुरी |प्रतिनिधी| Rahuri
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar Manmad Highway) आज दि. 5 फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी व मालट्रकचा समोरासमोर भीषण अपघात (Accident) होऊन दुचाकीवरील एक तरुण जागीच ठार (Death) झाला. तर एकजण गंभीर जखमी (Injured) झाल्याची घटना घडली आहे.
आज दि. 5 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सव्वा वाजण्याच्या दरम्यान दिनेश शिवराम चौव्हाण व दिनेश तुळाराम चौव्हाण हे दोन तरुण एमएच 17 डिए 4648 क्रमांकच्या दुचाकीवर चिंचोली फाटा येथून कोल्हारकडे जात होते. तर मालट्रक क्रमांक टिएन 30 सीएफ 1305 हा मालट्रक कोल्हारकडून (Kolhar) राहुरीकडे येत होता. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द परिसरात साई मंदिराजवळ नगर-मनमाड राज्य महामार्गावर ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी व मालट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
जखमी तरुणांना लोणी (Loni) येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी दिनेश शिवराम चौव्हाण याला उपचारा पूर्वीच मयत घोषित केले. तर दिनेश तुळाराम चौव्हाण हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सदर दोन्ही तरुण हे परप्रांतीय असून ते सध्या चिंचोली फाटा येथे राहत असून त्यांचा मूर्ती बनविण्याचा व्यवसाय असल्याची माहिती मिळाली.
दरम्यान अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातानंतर नगर-मनमाड महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.





