राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
राहुरी शहर हद्दीत नगर-मनमाड राज्य महामार्गावर साईट गटारचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आजपर्यंत अनेक छोटे-मोठे अपघात झाले असून दि. 26 मे रोजी श्रीरामपूर येथील एका दुचाकीस्वाराचा अपघात होऊन तो जागीच ठार झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. नगर-मनमाड महामार्गावर राहुरी शहर हद्दीत गेल्या अनेक महिन्यांपासून साईट गटारचे काम सुरु आहे. संबंधित ठेकेदाराने अनेक ठिकाणी चेंबरसाठी खड्डे केले आहेत. खड्ड्यातील माती डांबरी रस्त्यावर येऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होत आहे.
तसेच गटारीसाठी केलेल्या खड्ड्यात वरचे वर माती टाकून बुजविले जातात. त्यावरून वाहन गेल्यावर वाहने खड्ड्यात फसत आहेत. अनेक वाहने पलटी देखील झाली आहेत. राज्य महामार्गावरील विठ्ठला लॉन्स समोर सोमवार दि. 26 मे रोजी सायंकाळी सहा वाजे दरम्यान रहेमान समीउल्ला पठाण (वय 45) रा. शिरसगाव ता. श्रीरामपूर तसेच संतोष रहोजीनाथ धिरडे (वय 45) रा. घुमनदेव हे दोघेजण त्यांच्याकडील दुचाकीवरुन राहुरीकडून राहुरी फॅक्टरीकडे जात होते. त्यावेळी रस्त्यावर झालेल्या चिखलात त्यांची दुचाकी घसरुन ते रस्त्यावर पडले. त्यावेळी पाठीमागून आलेला एक मालट्रक रहेमान पठाण यांच्या अंगावरून गेल्याने ते जागीच ठार झाले.
तर त्यांच्याबरोबर असलेले संतोष धिरडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना श्रीरामपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक फौजदार तुळशीदास गिते, हवालदार संदीप ठाणगे तसेच रुग्णवाहिका चालक भागवत वराळे यांनी ताबडतोब जखमींना रुग्णालयात नेले. अपघात झाल्यानंतर काही वेळाने ना.राधाकृष्ण विखे पाटील हे रस्त्याने जात असताना गर्दी पाहून ते थांबले व घटनेची माहिती घेतली. यावेळी उपस्थित नागरिकांनी संबंधित रस्त्याचे व साईट गटारचे काम ताबडतोब करावे. तसेच संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.