कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
कोपरगाव नगर मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती या ठिकाणी लक्झरी बस व एका कारचा अपघात झाल्याने कारला लागलेल्या आगीत कारचालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी दोन्ही बाजूला नगर मनमाड महामार्गांवर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याच्या दिसून आल्या.
कोपरगाव होऊन येवल्याच्या दिशेने जाणारी लक्झरी बस क्रमांक एएस 01 क्यूसी 3516 ही भास्कर वस्ती येथे आली असता येवल्याकडून कोपरगावकडे जाणारी होंडा कंपनीची क्रेटा कार या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी इतकी भीषण होती की कारला आग लागली. त्या आगीत चालकासह कार पूर्ण जळून खाक झाली आहे. कार चालक विंचूर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी अग्निशनम दलाला तात्काळ माहिती दिली.
कोपरगाव पालिका अग्निशमन दल, येवला नगर पालिका अग्निशमन दलाचे बंब यांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळी नगर मनमाड महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. स्थानिज्ञ नागरिकांनी बसमधील प्रवाशांना वाचवण्यासाठी मोठे शर्थीचे प्रयत्न केले. कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यावेळी आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळावर हजर होते.




