राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
नगर मनमाड राज्य महामार्गावर (Nagar Manmad Highway) भरधाव वेगात आलेला मालट्रक राहुरी (Rahuri) शहरातील बसस्थानक समोर असलेल्या टपर्या व दुकानात शिरल्याची घटना दि. 22 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नसून मात्र दुकानदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मालवाहतूक ट्रक क्रमांक जी जे 10 टिएक्स 9244 हा मालट्रक दि. 22 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7 वाजे दरम्यान राहुरी फॅक्टरीकडून नगरकडे भरधाव वेगात जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने (Accident) राहुरी शहरातील बसस्थानक समोर असलेल्या दोन टपर्या व फळाच्या दुकानात शिरला. यावेळी तीन टपर्या जमीनदोस्त झाल्या. सकाळच्या वेळी दुकानात कोणी नसल्याने सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मात्र दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय नवले, संदीप ठाणगे, पोलिस नाईक जयदीप बडे आदि पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. आणि अपघात झालेला मालट्रक बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.
नगर मनमाड राज्य महामार्गाची झालेली दुरावस्था व काही ठिकाणी सुरु असलेली एकेरी वाहतूक अपघाताचे (Accident) कारण ठरत आहे. राज्य महामार्गाचे सुरु असलेले काम जलद गतीने करावे. आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात यावे, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.




