अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
गेल्या पाच ते सहा वर्षापासून रखडलेल्या जिल्ह्यातील नगर परिषदा व नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला असून प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी येत्या 28 ऑक्टोबरपर्यंत प्रसिद्ध करण्याची मुदत देण्यात आली आहे.
प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 8 ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर 8 ते 13 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी देण्यात आला आहे. या हरकती व सूचनांवर सुनावणी झाल्यानंतर 28 ऑक्टोबरला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट केले असून 7 नोव्हेंबरला मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 1 जुलै 2025 पर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांची नावे या मतदारयादीत राहणार आहे. त्यानुसार विधानसभेच्या मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजन करून ती यादी नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी वापरता येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट कले आहे.
दरम्यान, नगर परिषदा व नगर पंचायतच्या अंतिम प्रभाग रचनेच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग निश्चित झाले आहे. जिल्ह्यात ब वर्ग असलेल्या श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर या तीन नगर परिषदांसह क वर्गच्या जामखेड, राहाता, शेवगाव, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, देवळाली प्रवरा, शिर्डी नगर परिषदा तर एकच नेवासा नगर पंचायतीची निवडणुकी होत आहे. प्रभाग रचनेसह प्रभाग संख्या निश्चित झाली असल्याने आता प्रभागनिहाय मतदार संख्या देखील येत्या 28 ऑक्टोबरला निश्चित होणार आहे.
असा राहणार कार्यक्रम
प्रारूप मतदार यादी कार्यक्रम जाहीर करणे 8 ऑक्टोबर. 8 ते 13 ऑक्टोबरपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती व सुचना दाखल करणे. या हरकती व सूचनावर सुनावणी झाल्यानंतर 28 ऑक्टोबरला अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करत 7 नोव्हेंबरला मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
इच्छूकांना प्रतीक्षा
नगर परिषद व नगरपंचायतीची प्रभाग संख्या पुढीलप्रमाणे आहे. यात श्रीरामपूर 34, कोपरगाव 30, संगमनेर 30, जामखेड 24, राहाता 20, शेवगाव 24, राहुरी 24, श्रीगोंदा 22, पाथर्डी 20, देवळाली प्रवरा 21, शिर्डी 23, नेवासा नगर पंचायत 17. दरम्यान, नगरपरिषदा व नगर पंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणांबाबत प्रभागसंख्या देखील निश्चित करण्यात आली आहे. मात्र, अजून नगराध्यक्षपद व कोणत्या प्रभागासाठी कोणते आरक्षण हे निश्चित झालेले नाही. यामुळे सध्या इच्छूकांना प्रतीक्षा आहे.




