Friday, November 22, 2024
Homeनगर‘अर्बन’चा कर्जदार लुणावत अटकेत

‘अर्बन’चा कर्जदार लुणावत अटकेत

तारण मालमत्तेचे वाढीव मुल्यांकन दर्शवून घेतले मोठ्या रकमांचे कर्ज

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने आणखी एका कर्जदाराला अटक केली आहे. अक्षय राजेंद्र लुणावत (वय 34, रा. उंड्री, पुणे) असे या कर्जदाराचे नाव आहे. पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांच्या पथकाने पुण्यातील राहत्या घरातून त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, न्यायालयाने त्याला 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

अक्षय लुणावत हा कल्पद्रुमा ज्वेलर्सचा संचालक असून त्याच्या नावावर आठ कोटी रूपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. त्याने बँकेचे अधिकारी, पदाधिकारी व संचालक यांच्याशी संगनमत करून कल्पद्रुमा ज्वेल्स अ‍ॅण्ड जेम्स या कंपनीच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे तारण मालमत्तेचे वाढीव मुल्यांकन दर्शवून वेळोवेळी मोठ्या रकमांचे कर्ज घेतले. या कर्ज रकमेचा गैरवापर केला व कर्ज रकमेची परतफेड केलेली नाही. या कर्ज रकमेच्या वापराबाबत तपास करून रक्कम हस्तगत करायची आहे.

लुणावत याने सन 2015 मध्ये घेतलेल्या सहा कोटी रूपयांच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी नगर अर्बन बँकेचे कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नोलॉजी या फर्मच्या नावाने मंजुर कर्जाची रक्कम वापरण्यात आली आहे. टेरासॉफ्ट टेक्नोलॉजीच्या खात्यातून तीन कोटी 5 लाख रूपये माऊली ट्रेडर्स यांच्या मर्चंटस् बँकेतील खात्यात वर्ग केली व तेथून रोख स्वरूपात काढून ती रक्कम नगर अर्बन बँकेत जमा करून त्याव्दारे त्याचे कर्ज निरंक केल्याचे दर्शवलेले आहे. तसेच, लुणावत याच्या खात्यातून नगर अर्बन बँकेचे संचालक नवनीत सुरपुरीया, डॉ. निलेश शेळके व इतरांच्या खात्यावर वेळोवेळी रकमा वर्ग करण्यात आल्या आहेत. या रकमा बनावट कागदपत्राच्या आधारे घेतलेल्या कर्जापोटी त्याने संचालकांना दिल्या असण्याची शक्यता आहे. याचा तपास करण्यासाठी 7 दिवस पोलीस कोठडीची मागणी न्यायालयात करण्यात आली. न्यायालयाने 1 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या