Sunday, December 15, 2024
Homeनगरनगर अर्बनच्या संचालकांत फूट

नगर अर्बनच्या संचालकांत फूट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बँकींग व्यवसाय परवाना रद्द झालेल्या नगर अर्बन बँकेला वाचवण्यासाठी सत्ताधारी संचालक मंडळ व बँक बचाव कृती समितीने एकत्रित प्रयत्न करण्याचे ठरवले असले तरी या प्रयत्नांच्या नमनालाच अपशकून होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संचालक मंडळात फूट पडल्याने बँक वाचवण्याच्या प्रयत्नांना आता खीळ बसते की काय, अशी शंका ठेवीदार, कर्मचारी व सभासदांमध्ये आहे.

- Advertisement -

संचालक मंडळ सदस्य व बँक बचाव कृती समितीच्या एकत्रित बैठकीत बँक बचावचे मनोज गुंदेचा व बँकेचे संचालक गिरीश लाहोटी यांच्यात वाद झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे बँक वाचवण्याच्या प्रयत्नातून बाहेर पडत असल्याचे लाहोटींनी सोशल मीडियात जाहीर केले आहे. यावेळी त्यांनी संचालक मंडळातील सहकार्‍यांवरही टीका केल्याने संचालक मंडळात फूट पडल्याचे स्पष्ट झाले. पण यातून संचालकांमध्ये परस्परांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले तर बँक वाचवण्याचे सुरू झालेले प्रयत्न गतीमान होण्याची शक्यता धुसर मानली जात आहे.

बँकेचे संचालक लाहोटी यांनी सोशल मीडियात पत्र लिहून झालेल्या वादाची माहिती दिली व सर्वांची माफीही मागितली आहे. मी जाहीररित्या आपल्या सर्वांची माफी मागू इच्छितो व इथून पुढे बँकेच्या रद्द झालेल्या बँकींग परवानासंदर्भातील लढ्यातून माझी माघार जाहीर करतो व येथून पुढे मी कुठल्याही नगर अर्बन बँकेच्या कामकाजात हस्तक्षेप करणार नाही असेही जाहीर करतो, असे स्पष्ट केले आहे. बैठक ज्या निकषांवर ठरली होती त्याप्रमाणे पाठीमागील जुन्या सर्व गोष्टींना पूर्णविराम देण्याचे व सर्वांनी बँक वाचवण्याच्या उद्देशाने एकत्रित येण्याचेे ठरले होते. तसे न होता बैठकीत माझा व कुटुंबियांचा अपमान केला. हे सर्व घडत असताना विद्यमान संचालक मंडळातील सहकार्‍यांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. आपले सहकारीच साथ देत नसतील तर अशा सहकार्‍यांसोबत लढा उभारण्यात मला कुठलेही स्वारस्य नाही, असे लाहोटींनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या