अहिल्यानगर (प्रतिनिधी)
नगर अर्बन बँकेतील सुमारे 291 कोटी रूपयांच्या घोटाळ्याची चौकशी सध्या वेग घेत असून, राज्यात गाजत असलेल्या या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहारात आता थेट सक्तवसुली संचालनालय (इडी) कडून प्राथमिक चौकशी सुरू झाली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या चौकशीमुळे ठेवीदारांमध्ये दिलासा आणि अपेक्षा निर्माण झाली आहे.
बँकेतील घोटाळ्या प्रकरणाचा तपास येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू असून या प्रकरणात आता ‘इडी’ने हस्तक्षेप करत बँकेकडून सर्व महत्त्वाची कागदपत्रे मागवली आहेत. 8 जुलै रोजी बँकेच्या अधिकार्यांनी इडी कार्यालयात हजर राहून माहिती सादर केली आहे. बँकेने किती कर्जदारांकडून वसुली केली, किती कर्जदारांनी पैसे फेडण्यास नकार दिला, याची माहिती गोळा केली जात आहे. यासोबतच काही संशयितांना लवकरच इडी समन्स पाठवू शकते, असे सूत्रांनी सांगितले.
नगर अर्बन बँकेतील हा घोटाळा 2014 ते 2019 या कालावधीत घडला. माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. फिर्यादीत नमूद करण्यात आले होते की, त्या काळातील चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक व बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांनी संपूर्ण संचालक मंडळाच्या बैठका घेऊन कर्जप्रकरणे मंजूर केली. या कर्जप्रकरणांमध्ये काही कर्जदारांशी संगनमत करून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट, खोटे आर्थिक पत्रके व फसवे दस्तऐवज तयार करण्यात आले. या माध्यमातून बँकेचे आणि ठेवीदारांचे 100 ते 150 कोटींचे नुकसान झाले.
या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केल्यानंतर, सखोल चौकशीसाठी फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आले. या ऑडिट रिपोर्टमध्ये एकूण अपहाराची रक्कम 291.25 कोटी रूपये असल्याचे स्पष्ट झाले. या गुन्ह्यात आतापर्यंत 17 जणांना अटक करण्यात आली असून, यामध्ये तत्कालीन चेअरमन, संचालक, कर्जदार व इतर संबंधित यांचा समावेश आहे. प्रदीप पाटील, राजेंद्र लुणीया, मनेष साठे, अनिल कोठारी, अशोक कटारिया, शंकर अंदानी, मनोज फिरोदिया, प्रवीण लहारे, अविनाश वैकर, अमित पंडित, अक्षय लुणावत, राजेंद्र डोळे, डॉ. निलेश शेळके, केशव काळे, रवींद्र कासार, रवींद्र जेजुरकर, रूपेश भन्साळी या संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती. सर्व संशयित आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र चौकशीचा फास अधिक घट्ट होत चालला आहे.
ठेवीदारांना अपेक्षा
बँक घोटाळ्याच्या तपासात इडीच्या सहभागामुळे ठेवीदारांमध्ये नव्याने आशा निर्माण झाली आहे. इडी सारखी केंद्रीय संस्था या प्रकरणात सक्रिय झाली असल्यामुळे कर्जदारांकडून वसुली होण्याची शक्यता ठेवीदार मांडत आहेत. नगर अर्बन बँक घोटाळा हे प्रकरण आता केवळ आर्थिक गैरव्यवहार न राहता राजकीय, प्रशासकीय आणि सामाजिक स्तरावर दडपशाहीचे उदाहरण बनले आहे. इतक्या मोठ्या रकमेच्या घोटाळ्यात अनेक बड्या व्यक्तींची गुंतवणूक, संगनमत आणि फसवणूक उघड झाली असून, तपास यंत्रणांच्या कारवाईकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. आगामी काळात इडीच्या तपासातून अनेक नवीन बाबी उघडकीस येण्याची शक्यता असून, दोषींवर कठोर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे.




