Friday, November 22, 2024
Homeनगरनगर अर्बन बँक : डोळे याच्या खात्यात जमा झाल्या रकमा

नगर अर्बन बँक : डोळे याच्या खात्यात जमा झाल्या रकमा

19 जूनपर्यंत पोलिस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर अर्बन बँकेचा अधिकारी राजेंद्र डोळे याच्या खात्यात मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम जमा झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. कुवत नसताना कर्जाची शिफारस करणे, कर्जाची कागदपत्रे स्वतःच तयार करणे, असा ठपकाही त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने त्याला 19 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

येथील नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी ताब्यात घेतलेला अधिकारी राजेंद्र केशव डोळे (रा. सातारा) याला अटक करण्यात आली आहे. डोळे हा बँकेत कर्ज अर्ज छाननी विभागाचा सहायक प्रमुख व्यवस्थापक पदावर काम करत असताना अपहाराशी संबंधित पुष्कराज ट्रेडींग, एस. एस. साई डेव्हलपर्स, मे. तुकाराम एखंडे,

सुरेश इंडस्ट्रीज, स्वप्नील इंडस्ट्रीज, के. के. विद्युत, श्री गणेश एजन्सी, नयन एंटरप्रायजेस, यशराज वास्तू, नागेश प्रॉपर्टीज व इतर या कर्जदारांची कुवत नसताना व पुरेसे तारण नसताना त्यांच्या कर्जप्रकरणांना शिफारस दिल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच, घोटाळ्यातील आरोपी शितल शिवदास गायकवाड हिच्या जिजाई मिल्क प्रॉडक्ट या फर्मच्या नावे नगर अर्बन बँकेतून बिगर सहीच्या व वाढीव मूल्यांकन असलेल्या बनावट व्हॅल्युएशन रिपोर्टच्या आधारे 8 कोटी 50 लाख रुपये कर्ज वितरीत झालेले आहे. या कर्जप्रकरणाची सर्व कागदपत्रे डोळे याने मुख्य कार्यालयात तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या कर्जखात्यावर 15.13 कोटी रुपये येणे बाकी आहे. डोळे याला शुक्रवारी दुपारी तपासी अधिकारी तथा उपअधीक्षक अमोल भारती यांनी न्यायालयासमोर हजर केले. सरकार पक्षाच्यावतीने अ‍ॅड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली. फॉरेन्सिक ऑडिटच्या अहवालानुसार पोलिसांकडून संशयितांची चौकशी सुरू आहे. काही संचालक व अधिकारी, कर्जदारांना अटकही करण्यात आली आहे. तसेच, इतर काही अधिकार्‍यांचे जबाब नोंदवण्यात आले असून, त्यात डोळे याच्यावर संशय आल्याने त्यांना आर्थिक गुन्हे शाखेने त्याला अटक केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या