Saturday, July 27, 2024
Homeनगरवैयक्तिक हेव्यादाव्यांमुळे ‘अर्बन’च्या पुनरूज्जीवन प्रयत्नांना खीळ

वैयक्तिक हेव्यादाव्यांमुळे ‘अर्बन’च्या पुनरूज्जीवन प्रयत्नांना खीळ

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

विरोधकांकडून वैयक्तिक वैमनस्यातून व त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे जुने विषय पुढे करीत वैयक्तिक हेव्यादाव्यांना प्राधान्य देण्यात आल्याने नगर अर्बन बँक व बँकेचा बँकिंग परवाना पुन्हा मिळवण्यासाठीच्या एकत्रित प्रयत्नांना खिळ बसत असल्याचा दावा बँकेचे संचालक ईश्वर बोरा यांनी केला आहे.

- Advertisement -

बँक वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन विरोधकांना केल्यावर, एकीकडे एकत्र येण्याचा भास करीत दुसरीकडे लगेचच टीकास्त्र डागून व पुन्हा अर्वाच्य भाषेतून द्वेष प्रकट केल्यास एकत्र येण्याचे सर्व मार्ग बंद होऊन बँकेचे हित जोपासले जाणार नाही, असे आवाहन अध्यक्ष अशोक कटारिया यांनी केले होते. बँकेबाबत अप्रिय निर्णय आल्यावर आपले हेवेदावे बाजूला ठेवून बँकेचा परवाना पुन्हा बहाल होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याकरिता त्यांनी विरोधकांना फोन केला होता परंतु, विरोधकांना वैयक्तिक हेवेदावे पाहण्यातच रस असल्याचा आरोपही बोरा यांनी केला.

बोरा म्हणाले, बँकेची आर्थिक स्थिती सक्षम असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न आहे तर विरोधकांनी सातत्याने नकारात्मक विचारसरणीतून व सवयीप्रमाणे लावलेल्या चुकीच्या अंदाजाप्रमाणे बँकेची 113 वर्षांत मिळवलेली संपत्ती विकून बँकेच्या ठेवीदारांचे देणे देऊ, असा गैरसमज सभासदांमध्ये पसरवून तसेच तत्कालीन संचालकांसोबत विद्यमान संचालकांना अगदी खालच्या पातळीवर निर्लज्ज असे संबोधले गेले. अशा स्थितीत बँकेच्या संचालकांनी बँक बचाव समितीला सोबत घेऊन पुढील पावले उचलावीत अशी अपेक्षा करणे, ही खरेतर हास्यास्पद बाब आहे, असा दावाही बोरा यांनी केला.

बँकेच्या सभासदांनी 2014 च्या निवडणुकीत नाकारलेल्या व 2021 सालाच्या निवडणुकीत माघार घेतलेल्या तथाकथित स्वयंघोषित बँक बचाव समितीने आजपर्यंत सभासदांच्यादृष्टीने व बँकेच्या वसुलीच्या तसेच बँक वाचवण्याच्यादृष्टीने एकही सकारात्मक काम केलेले नाही, असा दावा करून बोरा म्हणालेे, बँक बचाव समितीला बँक वाचवण्यात स्वारस्य नसून केवळ बँकेच्या तत्कालीन चेअरमन व संचालकांविरूध्द काहीही करून कारवाई व्हावी व त्या माध्यमातून त्यांच्या पूर्ववैमनस्याचा हिशोब पूर्ण करण्याचीच त्यांची इच्छा स्पष्टरित्या व्यक्त होते. बँक वाचवण्याच्या उपाययोजनांवर व बँक या संकटातून कशी बाहेर पडेल या मूळ मुद्यावर भर न देता संचालकांना कसे वेठीस धरता येईल, केवळ याच मुद्द्यावर विरोधक भर देत आहेत, असा दावाही बोरा यांनी केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या