अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बँकेचे माजी अध्यक्ष (स्व.) दिलीप गांधी यांच्या परिवारातील पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने नामंजूर केलेले असल्याने त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असून आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना कधी अटक केली जाते, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
राजेंद्र गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल आहे. 28 कर्ज प्रकरणांतून बँकेची 150 कोटींची फसवणूक झाल्याची ही फिर्याद होती.
पोलिसांनी त्यानंतर बँकेच्या सर्वच कर्ज प्रकरणांचे फॉरेन्सिक ऑडीट केले. त्यातून आता 65 प्रकरणांतून 291 कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. यात भाजपचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष (स्व.) दिलीप गांधी व त्यांच्या परिवारातील सदस्यांचाही संबंध स्पष्ट झाला आहे. या सर्वांच्या खात्यात बँकेला विविध वस्तूंचा व साहित्याचा पुरवठा करणार्या ठेकेदारांकडून पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे या सर्वांवर पोलिसी कारवाईची टांगती तलवार असल्याने पाच जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते. न्यायालयाने त्यावर सुनावणी घेऊन सुरूवातीला दोघांचे व नंतर तिघांचे अर्ज नामंजूर केले आहेत. यामध्ये प्रगती देवेंद्र गांधी, देवेंद्र दिलीप गांधी, सरोज दिलीप गांधी, सुवेंद्र दिलीप गांधी व दीप्ती सुवेंद्र गांधी या पाच जणांचा समावेश आहे.
प्रगती गांधी व देवेंद्र गांधी यांचे जामीन अर्ज यापूर्वीच नामंजूर करण्यात आले होते. तर बुधवारी (3 जुलै) सरोज गांधी, सुवेंद्र गांधी व दीप्ती गांधी यांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. घोटाळ्यात सहभाग असलेल्या तात्कालीन संचालक, बँक अधिकारी व कर्जदारांना पोलिसांनी अटक केली आहे. दाखल गुन्ह्यात आपल्यालाही अटक केली जाऊ शकते या भितीने गांधी परिवारातील पाच जणांनी अटकपूर्वसाठी अर्ज दाखल केले होते. त्यांना अटकपूर्व देण्यास न्यायालयाने नकार दिल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून त्यांना कधी अटक केली जाते, याकडे ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.
ते पैसे गेले कोठे
फॉरेन्सिक ऑडीटमध्ये 291 कोटी रुपयांपैकी बहुतांश रकमेचे व्यवहार पैसे कोणत्या खात्यातून कोणत्या खात्यात गेले, हे स्पष्ट झाले आहे. मात्र, 72 कोटी रुपये रोख स्वरूपात काढले गेले असल्याच्या नोंदी आहेत, पण ते कोणी काढले, कशासाठी काढले व त्या पैशांची काय विल्हेवाट लावली, हे अनुत्तरीत प्रश्न आहेत. पोलिसांच्या तपासात या 72 कोटींचा हिशेब मिळवणे आव्हानात्मक झाले आहे.