Sunday, June 30, 2024
Homeनगरनगर अर्बन बँक घोटाळा : डॉ. शेळकेला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

नगर अर्बन बँक घोटाळा : डॉ. शेळकेला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर अर्बन बँकेच्या 291 कोटींच्या कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या डॉ. नीलेश शेळके याला 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कर्ज प्रकरणातील गैरव्यवहार, तसेच बँकेच्या शाखांतर्गत व्यवहारासाठी वापरल्या जाणार्‍या एचओबीआयटी खात्यातून डॉ. शेळके याच्या खात्यात रकमा वर्ग झाल्याचे फॉरेन्सिक ऑडिटमध्ये समोर आले आहे. तसेच डॉ. शेळके याच्याशी संबंधित कोट्यवधी रूपयांचे व्यवहार समोर आले आहेत.

आर्थिक गुन्हे शाखेकडून नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक घोटाळ्याचा तपास सुरू आहे. माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीनुसार दाखल गुन्ह्यात बँकेच्या सर्व कर्ज खात्यांचे व व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात आलेले आहे. त्या आधारावर काही संचालक, कर्जदार व बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना यापूर्वी अटक झालेली आहे. शहर सहकारी बँक व नगर अर्बन बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज गैरव्यवहार प्रकरणी यापूर्वी डॉ. शेळके अटकेत होता. आर्थिक गुन्हे शाखेमार्फतच याचा तपास सुरू होता. त्यात शेळके याला जामीन मंजूर झालेला आहे.

सोमवारी डॉ. शेळके न्यायालयात हजर होता. तेथून बाहेर पडल्यावर आर्थिक गुन्हे शाखेने त्याला दुसर्‍या गुन्ह्यात अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. डॉ. शेळके याच्या नावे विविध खात्यातून कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झालेले आहेत. रोख स्वरूपात काही रकमा काढण्यात आल्या आहेत. या सर्वांचा तपास करायचा असल्याने सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती. न्यायालयाने 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या