नाशिक | Nashik
राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींचे अध्यक्ष आणि नगरसेवक निवडणुकांची मतमोजणी काही वेळातच सुरू होणार असून, दुपारपर्यंत निकाल हाती येणार आहे. नगरपालिका आणि नगरपंचायतींचा पहिला टप्पा २ डिसेंबरला पार पडलेला तर दुसरा टप्पा उर्वरित २३ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या अध्यक्ष व १४३ सदस्यपदांसाठी शनिवारी झालेल्या मतदानात कोणाला कौल मिळाला, हे आजच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
काही नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारांप्रमाणे काही ठिकाणी नगराध्यक्ष बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे बिनविरोध निवडून आलेल्या जागा वगळता दोन्ही टप्प्यातील जवळपास साडेसहा हजाराहून अधिक जागांसाठी रविवारी मतमोजणी होईल. या मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली असून आवश्यक तेथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजप पुढे
काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या एक्झिट पोलनुसार नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप निर्विवादपण पहिल्या क्रमांकाचा पक्ष राहिल असे अंदाज वर्तवण्यात आले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेस असेल. त्यानंतर अजित पवार गटाला यश मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले आहे.
आठ वर्षांनंतर होत आहे निवडणुका
आधी कोरोना महामारीचे संकट, मग इतर मागासवर्ग आरक्षण, प्रभाग रचना यामुळे अनेक वर्ष रखडलेल्या नगरपालिका, नगर पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका अखेर संपन्न झाल्या आहे. या निवडणुका सत्ताधारी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने पूर्ण ताकदीनिशी लढवल्या. अनेक महत्त्वाच्या नगरपालिकांमध्ये महायुतीच्या घटक पक्षांमध्ये लढत होत आहे. त्यामुळे येथील लढतींविषयी उत्सुकता आहे. यामध्ये कोकणात भाजप-शिंदेसेनेने एकमेकांचे नेते पळविल्याने दोन पक्षांमध्ये कमालीची कटूता आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, असे चित्र प्रकर्षाने दिसले. शिंदेसेनेचे आमदार नीलेश राणे विरुद्ध भाजप असा संघर्ष टोकाला गेला. मराठवाड्यात काही ठिकाणी भाजपचे आणि शिंदेसेनेचे नेते एकमेकांना भिडले. सोलापुरात अनगरला मोठे राजकीय नाट्य पहायला मिळाले.
दरम्यान, या निवडणुकीत भाजपसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभा घेतल्या. तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचाराची आघाडी सांभाळली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामतीसह अनेक ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधीमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रचारात भाग घेतला. यंदा प्रथमच नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा संघर्ष ही पहायला मिळाला..या निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच विक्रमी मतदान झाल्याचे ही पहायला मिळाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




