नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
नांदगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी नवीन तहसील येथील इतर शासकीय कार्यालयात मतमोजणी प्रक्रियेला आज (रविवारी) सकाळी १० वाजेपासून सुरुवात होणार असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदाणे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्यधिकारी शामकांत जाधव यांनी सांगितले.
नांदगाव नगरपरिषद निवडणुकीत थेट नगराध्यक्ष व १० प्रभागातून २० नगरसेवक रिंगणात होते .या निवडणुकीतून ७ नगरसेवक बिनविरोध झाले.. नगरपरिषदेच्या इतिहासात प्रथमच शिदेसेनेचे ७ नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. १३ जागेसाठी ३६ उमेदवार रिंगणात आहे. नगराध्यक्षपद हे जनतेतून निवडले जाणार आहे. इव्हीएम मशिन नवीन तहसील येथील इतर शासकीय कार्यालय येथील स्टॉकरूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. याची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी रविवारी होणार आहे. मतमोजणीसाठी १० टेबल लावले जाणार आहेत.
रविवारी सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.. मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रत्येक टेबलवर 5 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यात मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक तसेच शिपाई आणि कोतवाल यांचा समावेश आहे. याबरोबरच मॅन्युअल टीम, एक्सेल टीम, ऑनलाईन टीम नेमण्यात आली आहे. एकूण 50 कर्मचाऱ्यांची निवड या प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. प्रभाग क्रमांकानुसार प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र टेबल लावले जाईल. त्या त्या प्रभागाच्या टेबलवर नगराध्यक्षपदासाठी झालेल्या मतांची मोजणी केली जाणार आहे.
दरम्यान, ०२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी शिदेसेना- भाजप युतीचे सागर हिरे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे राजेश बनकर यांच्या सह शहरातील १२ जागेसाठी नगरसेवक पदासाठी 36 उमेदवार रिंगणात असून त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी ची सर्वतोपरी तयारी केली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज झाली आहे.




