नागपूर | Nagpur
राज्य विधिमंडळाचे नागपूर (Nagpur) येथे हिवाळी अधिवेशन सुरु असून, अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा चालू आहे. एकीकडे हे अधिवेशन सुरु असताना दुसरीकडे नागपूरात प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सरकारकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना (CMYKPY) सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश बेरोजगार तरुणांना रोजगार-भिमुख प्रशिक्षण देणे आणि त्यांना आर्थिक सहाय्य करणे असा आहे. यामध्ये १२ वी उत्तीर्ण तरुणांना प्रशिक्षण कालावधीत दरमहा सहा ते दहा हजार रुपयापर्यंत भत्ता मिळतो. मात्र अकरा महिने प्रशिक्षण घेतल्यानंतर कायमस्वरुपी नोकरी न मिळाल्याने आज हे तरुण-तरुणी आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
मुख्यमंत्री युवाकार्य आणि प्रशिक्षणार्थी तरुणांचे नागपुरात ०९ डिसेंबरपासून आंदोलन (Protest) सुरु आहे. पण आपल्या या आंदोलनाची प्रशासन आणि सरकारकडून (Government) दखल घेतली जात नसल्याने या आंदोलक तरुण-तरुणींनी (दि.१३ डिसेंबर) रोजी अधिवेशनात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून (Police) त्यांची लागलीच धरपकड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि काही जणांना ताब्यात घेतल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, या आंदोलक तरुण-तरुणींनी (Youth) सरकारने शब्द पाळला नाही, असा आरोप केला आहे. या आंदोलकांकडून आधी शांततेत आंदोलन सुरु होते. पंरतु, आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही म्हणून त्यांनी थेट ‘लोटांगण मोर्चा’ विधान भवनाच्या दिशेला काढला. पण हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यावेळी आंदोलक तरुणांनी आम्ही प्रशिक्षणार्थी आहोत. आमची मागणी रास्त आहे, त्यामुळे जीआर निघाला पाहिजे, असे म्हटले.




