मुंबई | प्रतिनिधी | Mumbai
धारावीची सर्व जमीन अदानीला देण्याचा सरकारचा निर्णय आहेच, पण वरळीतील दूध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमिनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानीला (Adani) देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला येतात आणि महाभ्रष्ट युती सरकार त्याचे पालन करत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शनिवारी येथे केला. मात्र, कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकू देणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
हे देखील वाचा : Uddhav Thackeray : मोदी-शाहांचा मुंबईला ‘अदानी सिटी’ बनवण्याचा डाव; उद्धव ठाकरेंची घणाघाती टीका
आज माध्यमांशी बोलतांना पटोले म्हणाले की, अदानीच्या धारावी प्रकल्पाबद्दल (Dharavi Project) काँग्रेस (Congress) पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही या मुद्द्यावर भूमिका जाहीर केलेली आहे. परंतु, भाजप (BJP) सरकार मुंबईतील महत्वाचे आणि मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे टेंडर दुबईच्या एका कंपनीला मिळाले होते. पण नंतर ते रद्द करुन अदानीला देण्यात आले. महायुती सरकार हे गुजरातच्या इशाऱ्यावर चालत आहे. मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा भाजपप्रणित शिंदे सरकारचा प्रयत्न काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही. राज्यातील जनतेत महायुती सरकारच्या या गुजरात धार्जीणेपणाबद्दल प्रचंड विरोध आहे.
हे देखील वाचा : ‘लाडकी बहीण योजने’चे फॉर्म ‘मविआ’च्या कार्यकर्त्यांकडे देऊ नका; रावसाहेब दानवेंचे आवाहन
महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणून कार्यक्रम सुरू केले आहेत. पण ही वाघनखे महाराजांची नाहीत. इतिहासतज्ञ इंद्रजित सावंत यांनी लंडन म्युझियमला पत्र पाठवून त्याची माहिती घेतली असता म्युझियमने ते स्पष्ट केले आहे. असे असतानाही महायुती सरकारने जनतेचा पैसा खर्च करून सोहळा केला. ज्या लोकांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे जाहीर करुन २०१७ मध्ये जलपूजनही केले ते स्मारक अजून झालेले नाही. हेच लोक शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात सर्वात पुढे होते. या लोकांनी छत्रपतींचा मानाचा जिरेटोपही नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवाजी महाराजापेंक्षा नरेंद्र मोदी (Narendra Modi) श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला, अशी टीका पटोले यांनी यावेळी केली.
हे देखील वाचा : विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील; राष्ट्रवादीच्या आमदाराचे मोठे विधान
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहे. १० वर्षापासून महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या भगिनींना १ हजार ५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाच्या योजनांची (Yojana) नावे बदलून त्या राबवल्या जात आहेत, असेही पटोले म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा