Tuesday, February 3, 2026
Homeमहाराष्ट्रCrime News : महाराष्ट्र हादरला! सरपंच होण्याच्या हव्यासापोटी नराधम बापाने पोटच्या लेकीचा...

Crime News : महाराष्ट्र हादरला! सरपंच होण्याच्या हव्यासापोटी नराधम बापाने पोटच्या लेकीचा घेतला बळी

नांदेड । Nanded

राजकारणाची हाव आणि सत्तेची लालसा माणसाला कोणत्या थराला नेऊ शकते, याचा एक अत्यंत सुन्न करणारा प्रकार नांदेड जिल्ह्यात समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अडथळा ठरणारी आपली सात वर्षांची मुलगी ‘प्राची’ हिची जन्मदात्या पित्यानेच तेलंगणात नेऊन हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात संताप व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील रहिवासी असलेला ३२ वर्षीय पांडुरंग कोंडामंगले हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याचे बारळी येथे हेअर कटिंगचे दुकान आहे. त्याला एकूण तीन मुले आहेत. आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्याच्या गावातील सरपंच पदाचे आरक्षण ओबीसीसाठी सुटले होते. ग्रामस्थांनी त्याला निवडणूक लढवण्यासाठी प्रोत्साहन दिले होते, परंतु महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार तीन अपत्ये असणाऱ्या व्यक्तीला निवडणूक लढवता येत नाही. हाच नियम त्याच्या राजकीय प्रवासात अडथळा ठरत होता.

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी पांडुरंगने पत्नीला दुकानचे साहित्य खरेदी करण्यासाठी जात असल्याचे सांगितले. यावेळी त्याने आपली सात वर्षांची मुलगी प्राची हिलाही सोबत नेले. तो तिला घेऊन तेलंगणा राज्यात गेला आणि तेथील कट्टापल्ली परिसरातील बोधन रोडवरील एका कॅनॉलमध्ये तिला जिवंत फेकून दिले. या क्रूर कृत्यानंतर तो एकटाच घरी परतला. दरम्यान, तेलंगणातील कॅनॉलमध्ये चिमुकलीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.

तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू केला. तपासाचे धागेदोरे नांदेडच्या मुखेडपर्यंत पोहोचले आणि पोलिसांनी ३० जानेवारी रोजी पांडुरंग कोंडामंगले याला संशयावरून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच या क्रूर पित्याने आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती समोर येत आहे. सुरुवातीला त्याने आर्थिक विवंचनेतून हे पाऊल उचलल्याचा बनाव रचला होता, मात्र तपासात निवडणूक लढवण्याची इच्छा हेच मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे.

या भीषण हत्येपूर्वी पांडुरंगने छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन एका वकिलाचा सल्लाही घेतला होता, असे समजते. तिसरे अपत्य निवडणुकीत अडसर ठरत असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण कटात सरपंच आणि आरोपीच्या पत्नीचाही सहभाग असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अद्याप पोलिसांनी यावर कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी, या घटनेने माणुसकीला काळीमा फासला आहे.

ताज्या बातम्या

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांच्यावर दोन मोठ्या जबाबदाऱ्या, थेट सरकारी...

0
मुंबई । Mumbai राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर...