Wednesday, June 26, 2024
Homeनंदुरबारभाजपा नगरसेवकाने महिला तलाठ्यास केली मारहाण

भाजपा नगरसेवकाने महिला तलाठ्यास केली मारहाण

नंदुरबार – Nandurbar – प्रतिनिधी :

- Advertisement -

नंदुरबार येथे वाळू वाहतूक करण्याबाबत 10 टक्के खनिज विकास निधी पासची विचारणा केल्याच्या कारणावरुन एका भाजपा नगरसेवकाने वाळू वाहतूक तपासणी पथकातील महिला तलाठ्यास मारहाण केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी वाहनासह चालकास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आदिवासी संघटनांकडून नगरसेवकांना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर भाजपा नगरसेवकाने मात्र मारहाण केल्याचा आरोप फेटाळला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत गुजरात राज्यातील वाळू घाटातून मोठ्या प्रमाणावर वाळूची वाहतूक रात्रंदिवस सुरु आहे. यामुळे रस्त्यांची परिस्थिती खराब झाली आहे. अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी नंदुरबार तहसील कार्यालयाकडून वाळू वाहतूक तपासणी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे.

सदरचे पथक सकाळी 6 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाहनांची तपासणी करत आहेत. त्यानुसार नंदुरबार तहसील कार्यालयातील वाळू तपासणी पथकातील वैंदाणे येथील महिला तलाठी रुपाली डोंगरदिवे, खामगाव येथील तलाठी व्ही.पी.काकुळदे, पर्यवेक्षाधिन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक प्रशांत लोखंडे यांच्यासह महिला तलाठी निशा पावरा या काल दि.5 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास वाहनांची तपासणी करत होते. यावेळी वाळू वाहतूक करणारे डम्पर (क्र.एम.एच.39 एडी 0966) आले असता चालकास पथकातील कर्मचार्‍यांनी रॉयल्टीबाबत विचारणा केली.

यावेळी त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. मात्र रॉयल्टी पास दाखविली. चालकास पथकातील कर्मचार्‍यांनी 10 टक्के खनिज विकास निधी पासची विचारणा केली असता त्याच्याकडे ती आढळून आली नाही. यावेळी डम्पर चालकास सदरचे वाहन तहसील कार्यालयात जमा करण्याचे सांगितले असता त्याने मालक येत असल्याचे सांगून वाहन सोडून पसार झाला. सुमारे दीड तासापर्यंत कोणीही आले नाही.

यादरम्यान, पथकातील कर्मचार्‍यांनी दोन डम्पर व एक ट्रक असे तीन वाहन नंदुरबार तहसील कार्यालयात जमा केली. 11 वाजेच्या सुमारास घटनास्थळी डम्पर मालक गौरव चौधरी, डम्पर चालक व आणखी काही जण घटनास्थळी आले. यावेळी पथकातील कर्मचार्‍यांनी संबंधितांना सदरचे वाहन तहसील कार्यालयात जमा करण्यास सांगितले. यावेळी पथकातील कर्मचारी व नगरसेवक गौरव चौधरी यांच्यात वाद निर्माण झाला.

यादरम्यान चालकाने डम्पर करण चौफुलीकडे नेत असतांना पथकातील कर्मचार्‍यांनी शासकीय वाहनाने त्याचा पाठलाग करुन उड्डाण पूलाशेजारील मिरची पथारीवर डम्पर अडविले. यावेळी महिला तलाठी निशा पावरा व नगरसेवक गौरव चौधरी यांच्यात वाद निर्माण झाला. घटनास्थळी गौरव चौधरी यांनी निशा पावरा यांना धक्काबुक्की करुन अश्लिल, जातीवाचक शिवीगाळ करीत कानशिलात मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सदरच्या फिर्यादीवरुन संशयित गौरव चौधरी, डम्परवरील चालक व गौरव चौधरी यांच्या वाहनावरील चालक अशा तिघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम 353, 332, 354, 323, 504, 509, 34 सह अनुसूचित जाती जमाती अ.प्र.कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी प्रभारी पोलिस अधिक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिगंबर शिंपी, पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील, गणेश सुर्यवंशी यांनी भेट दिली आहे. पुढील तपास उपविभागीय अधिकारी सचिन हिरे करीत आहेत. दरम्यान, डंम्पर चालक व वाहनास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

तिघा संशयितांना अटक होईपर्यंत नंदुरबार तालुका तलाठी संघातर्फे बेमुदत कामबंद आंदोलन

महिला तलाठी कर्मचारी यांना कर्तव्य बजावतांना मारहाण झाल्याने नंदुरबार तालुका तलाठी संघाकडून कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांना निवेदन देण्यात आले आहे.

तिघा संशयितांना अटक होईपर्यंत नंदुरबार तालुका तलाठी संघ बेमुदत कामबंद आंदोलन करणार असून यापुढे गौणखनिज संदर्भात कोणतेही काम करणार नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर रबेन गावित, झेड.के.गायकवाड, एन.आर.पावरा, के.एस.नाईक, ए.पी.देशमुख, एम.डी. गावित, एस.पी.वसावे, डी.एन.गीते, बी.एस.वळवी, पी.डी.गायकवाड, व्ही.पी.काकुळदे, के.डी.सुर्यवंशी, एस.पी.शिंदे,रुपाली डोंगरदिवे, पी.एल.पाटील, बी.डी.धनगर, एन.बी.मराठे, एम.ए.माळी, पी.ए.वसावे, ए.बी.कोकणी, डी.ए.वळवी, ए.पी.ठाकरे, एस.पी.यादव, व्ही.पी.गावित, ए.एल.पवार, एम.के.राठोड, जयेश राऊळ, एस.एस.पवार, जे.आर.जोशी यांच्या सह्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या