शहादा –
शहरातील प्रकाशा रोडवर वीज वितरण कंपनीच्या शासकीय निवासस्थानाच्या तिसर्या मजल्यावरील घराचा कडीकोंडा तोडून रोख रकमेसह सुमारे एक लाखाचा मुद्देमाल चोरट्यानी चोरून नेल्याची घटना भरदुपारी घडली.
यामुळे शासकीय निवासस्थानातील रहिवासी यांच्यामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत शहादा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथील वीज वितरण कंपनीत दयानंद अनंत भामरे प्रधानतंत्रज्ञ आहेत. ते प्रकाशा रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या शासकीय निवासस्थानांमध्ये राहतात. दवाखान्यानिमित्त आज धुळे येथे गेले होते.
त्यादरम्यान दुपारी चार ते पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी घरांत प्रवेश करून सुमारे एक लाख रुपयांचा मुदेमाल लंपास केला आहे. घरातील बेडरूममधील सामान अस्ताव्यस्त असल्याने त्यांना संशय आला. त्यानी लगेच पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
त्या ठिकाणी पोलिस कर्मचारी दिनेश लाडकर, संजय रामोळे, चेतन चौधरी, व्ही.टी.पावरा यानी भेट देऊन माहिती घेतली असता चोरी करणारे हे दोन किवा जास्त असल्याची माहिती दिली.
चोरट्यांनी कपाट्यातील ठेवलेले तीस हजार रूपये किमतीचा सोनी कंपनीचा टि.व्ही. 54 हजार रूपये रोख, 3 हजार रूपये लहान मुलांचा गल्ला व किरकोळ रक्कम असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे.
वीज वितरण कंपनीच्या आवारात सीसीटीव्ही असल्याने चोरटे कॅमेर्यात कैद झाले आहेत. त्याचा तपास पोलिस करत आहे. शासकीय कार्यालयात प्रथम चोरी झाल्याने येथील रहिवासी यांच्यात घबराट निर्माण झाली आहे.
नंदुरबार येथील श्वान पथक व ठसे तंज्ञ यांना प्राचारण करण्यात आले होते. शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढल्या असल्याने नागरीकांमध्ये भिंतीचे वातावरण पसरले आहे.