Tuesday, January 6, 2026
HomeराजकीयNarayan Rane : नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत, म्हणाले, "आता घरी बसायचं...

Narayan Rane : नारायण राणे यांचे निवृत्तीचे संकेत, म्हणाले, “आता घरी बसायचं ठरवलंय… नांदा सौख्यभरे!”

मुंबई । Mumbai

महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे व्यक्तिमत्व आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे मोठे संकेत दिले आहेत. सिंधुदुर्ग येथे आयोजित एका जाहीर सत्कार समारंभात बोलताना त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. “आता घरी बसायचं ठरवलंय, दोन्ही मुलांना सांगेन… नांदा सौख्यभरे,” अशा शब्दांत राणेंनी आपल्या राजकीय संन्यासाचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

आपल्या भाषणादरम्यान नारायण राणे यांनी प्रकृती आणि वयाचा उल्लेख करत निवृत्तीचे कारण स्पष्ट केले. ते म्हणाले की, “वय वाढते तसे शरीर थकते. आता माझे दोन्ही मुलगे (निलेश आणि नितेश) राजकारणात पूर्णपणे स्थिर झाले आहेत. त्यामुळे आता आपल्या व्यवसायाकडेही लक्ष देण्यासाठी कोणाची तरी गरज आहे.” आपल्या मुलांच्या राजकीय कारकिर्दीवर विश्वास व्यक्त करत त्यांनी इथून पुढे व्यवसायाला वेळ देण्याचे मानस बोलून दाखवले.

YouTube video player

नारायण राणे यांनी यावेळी राजकारणातील सद्यस्थितीवर आणि त्यांच्याविरोधात होणाऱ्या कारस्थानांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “राजकारणात सध्या मोठ्या प्रमाणावर कट-कारस्थानं केली जात आहेत. म्हणूनच मी आता थांबण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक जण माझ्या मार्गात अडथळे निर्माण करण्यासाठी आले, त्यांच्याबद्दल मी आज बोलणार नाही. आजही मी सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगतो, रस्त्यावर भाजी विकत घेतो. माणुसकी हाच माझा खरा धर्म आहे.”

आपल्या पश्चात सिंधुदुर्गच्या विकासाची धुरा निलेश आणि नितेश राणे सांभाळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांना आवाहन करताना ते म्हणाले, “माझ्यानंतर निलेश आणि नितेश विकासात्मक राजकारण करतील. त्यांनी हाक दिली की तुम्ही त्यांना साथ द्या. चांगल्या माणसांना जोपासा आणि त्यांच्याकडून जनसेवा करून घ्या.” यावेळी त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आणि स्वार्थासाठी किंवा पैशासाठी राजकारण न करण्याचा सल्लाही दिला.

आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना राणे म्हणाले की, सिंधुदुर्गातील जनतेने दिलेले प्रेम पाहून मी भारावून गेलो आहे. “मी राज्याचा मुख्यमंत्री झालो, आजही लोक आदराने माझे नाव काढतात. पण राजकारणात आता कोणावर विश्वास ठेवावा असे लोक दिसत नाहीत. या जिल्ह्यात माझ्या आधी किंवा माझ्या नंतर माझ्यासारखे विकासकाम करून दाखवणारा एकही नेता दाखवा,” असे थेट आव्हानही त्यांनी विरोधकांना दिले. द्वेषाच्या राजकारणाला थारा देऊ नका, असा सल्ला देतानाच त्यांनी आपल्या मार्गात आडवे येणाऱ्यांना कडक इशाराही दिला. नारायण राणेंच्या या विधानामुळे कोकणच्या आणि राज्याच्या राजकारणात भविष्यात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रातून आता पावसाचे अपडेट

0
अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे लहरी, खराब हवामानामुळे शेतकर्‍यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प...