नाशिक | प्रतिनिधी | Nashik
इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या माजी आमदार निर्मला गावित (Nirmala Gavit) यांना त्याच्या घराजवळ कारने उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत गावित गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, निर्मला गावित या आपल्या घराजवळ पायी आपल्या नातवाला फिरवत असताना पाठीमागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. यात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु असल्याचे समजते.
निर्मला गावित या मूळच्या काँग्रेसवासी असून, त्यांच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेसमधून (Congress) झाली आहे. त्या माजी केंद्रीय मंत्री दिवंगत माणिकराव गावित यांच्या कन्या आहेत. निर्मला गावित या दोनवेळा इगतपुरी- त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार राहिल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तसेच मे २०२५ मध्ये गावित यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे.




