नाशिक | Nashik
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी आज बुधवार (दि. २० नोव्हेंबर) सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून मतदार केंद्रांवर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मतदारांमध्ये मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे. मात्र, या मतदानादरम्यानच नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे (Suhas Kande) यांच्यात जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यात कांदे यांनी समीर भुजबळ यांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली असून तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
हे देखील वाचा : Assembly Election 2024 : नांदगावमध्ये राडा; समीर भुजबळ-सुहास कांदे आमनेसामने
याबाबत अधिक माहिती अशी की, सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. यावेळी भुजबळ यांनी कुठल्याही परिस्थितीत मतदार जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आले असता कांदे यांनी आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिल्याचे व्हिडीओत दिसत आहे.
दरम्यान, पोलिसांकडून (Police) दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. दुसरीकडे काही वेळाने समीर भुजबळांनी अडवून ठेवलेले मतदार (Voter) संतापल्याचे पाहायला मिळाले. “आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला मतदानापासून वंचित ठेवू नका, पोलिसांनी आमचे आधारकार्ड तपासावे, आम्ही बिहारी नाही तर मतदारसंघातीलच आहोत, जेवणासाठी केवळ थांबलेलो होतो, संयम बाळगला, आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका”, असे म्हणत मतदारांनी संताप व्यक्त केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा