नाशिक | Nashik
गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे काही अंशी गुंडांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. पोलिसांच्या या कारवायांमुळे राजकीय पुढारीही धास्तावले आहेत. अशातच विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल (सोमवारी) नांदेड येथे माध्यमांशी बोलतांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिकमधील एका माजी निकटवर्तीय नगरसेवकाने एका आमदाराच्या हत्येची सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबतचा दानवे यांचा व्हिडीओही समोर आला आहे.
सदर व्हिडीओमध्ये अंबादास दानवे म्हणत आहे की, “नाशिक शहरातील एका माजी नगरसेवकाने एका आमदाराच्या हत्येची सुपारी दिली असून, हा गंभीर विषय आहे. हा माजी नगरसेवक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय असून,या प्रकरणाची पोलिसांनी आणि राज्य सरकारने चौकशी करावी. असे त्यांनी म्हटले आहे. दानवेंच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, अंबादास दानवेंनी बोलतांना आमदाराच्या हत्येची सुपारी देणारा माजी नगरसेवक कोण? याचा उल्लेख टाळलेला आहे यामुळे सस्पेन्स वाढला आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये तो नगरसेवक आणि आमदार कोण? याची कुजबुज सुरु आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यावर नेमकी काय प्रतिक्रिया देतात? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.





