नाशिक | Nashik
शहरात भाजपमध्ये (BJP) उमेदवारीवरून प्रचंड राडा झाला आहे. काहींना तुम्ही सर्व्हेत मागे आहात म्हणून उमेदवारी नाकारण्यात आली. तर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देखील थांबविण्यात आले. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत एकच गोंधळ घातला. तसेच विल्होळी येथील एका बंगल्यावर एबी फॉर्म वाटपाचे काम सुरु असताना त्याठिकाणी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती. यामुळे भाजपमधील नाराजीनाट्य चव्हाट्यावर आल्याचे बघायला मिळाले.
शहराध्यक्ष सुनील केदार (Sunil Kedar) यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची माहिती मिळताच इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. या वाहनामध्ये आमदार राहुल ढिकले आणि सीमा हिरे असल्याचे सांगितले जाते.यावेळी कार्यकर्त्यांनी पक्षाच्या जुन्या आणि निष्ठावंतांना डावलून काही नवीन आणि बाहेरून आलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली.पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनही संधी मिळत नसेल, तर मेहनतीचे मोल काय? अशी खदखद देखील निष्ठावंत कार्यकर्त्यांनी जाहीरपणे प्रकट केली.
हे देखील वाचा : Nashik Politics : नाशिकमध्ये मविआत ठाकरेंची शिवसेना ‘मोठा भाऊ’; कोण किती जागा लढवणार? आकडेवारी आली समोर
दरम्यान, भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी दोन कोटींना तिकीट वाटल्याचा आरोपही यावेळी केला. तसेच मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले तर आम्ही उमेदवारी (Candidacy) मागणार नाही, असेही भाजपच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. या घटनेवरून नाशिकमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.




