नाशिक | Nashik
भाजपमध्ये आज (गुरुवारी) शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे, माजी आमदार नितीन भोसले यांच्यासह मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी पुत्र अमोल पाटील, पत्नी लता पाटील आणि माजी नगरसेवक रवींद्र धिवरे यांनी प्रवेश केला. यातील पांडे, वाघ, खैरे यांच्या पक्षप्रवेशाला नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Pharande) यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी जोरदार विरोध दर्शविला. या पक्षप्रवेशावेळी भाजप कार्यलयात नाट्यमय घडामोडी घडल्याचे बघायला मिळाले. त्यानंतर आमदार फरांदे यांनी माध्यमांशी संवाद साधला असता या पक्षप्रवेशावेळी आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची खंत व्यक्त केली.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : अखेर नाट्यमय घडामोडी अन् विरोधानंतर माजी आमदार भोसले, पांडे, वाघ, पाटील, खैरेंचा भाजपमध्ये प्रवेश
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, “आज झालेल्या पक्षप्रवेशाला माझा विरोध नाही. पंरतु, त्या मतदारसंघाची आमदार म्हणून त्याठिकाणी बबलू शेलार या सक्षम उमेदवाराचा पक्षप्रवेश झालेला होता, तर उर्वरित उमेदवार पक्षाकडे होते. शेलार आणि पक्षाचे इतर तीन उमेदवार (Candidate) असे पॅनेल तयार झाले असते तर ते शंभर टक्के निवडून आले असते असं लोकप्रतिनिधी या नात्याने माझे मत होते. वर्षानुवर्ष कार्यकर्ते पक्षात काम करतात, जर निवडून येण्याचे संकेत दिसत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभे राहणे आवश्यक होते. त्याठिकाणी बाहेरून आलेला एक आणि त्याच्याबरोबर तीन दिले तर पक्ष विजयी होईल, यासाठी मी आजची भूमिका मांडली होती, असे आमदार फरांदे यांनी म्हटले.
पुढे त्या म्हणाल्या, “गेल्या चाळीस वर्षात माझ्या स्वत:वर कधी अन्याय झाला असेल तर कधीही जाहीर भूमिका घेतली नाही. पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि ती भूमिका मी कधीही घेणार नाही. पंरतु, सर्वांनीच नेते व्हायचे आणि प्रत्येकाने आपआपले बघायचे मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचे. त्यामुळे सकाळी सोशल मीडियावर याबाबत पोस्ट केली. पक्षातील मी सामान्य कार्यकर्ती आहे. माझ्या डोळ्यासमोर कार्यकर्त्यांचा बळी दिला जात असेल तर हे मला बरोबर वाटले नाही, असे म्हणताच आमदार देवयानी फरांदे यांचे डोळे पाणावले. यानंतर त्यांनी पक्षामध्ये जे आलेले आहेत त्याचं पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी म्हणून स्वागत करते. मात्र, आज जे काही घडलं ते मला आवडलेलं नाही”, असे म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.
हे देखील वाचा : Nashik BJP Politics : आमदार फरांदेंचा पांडे, वाघ, खैरेंच्या पक्षप्रवेशाला कडाडून विरोध; भाजपमधील अंतर्गत खदखद चव्हाट्यावर
काही दलालांच्या स्वार्थातून आजचे राजकारण झाले
मला कोणी कोंडीत पकडत असेल तर त्याने जरूर पकडावे. पंरतु, या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतं माझ्या भूमिकेच्या सोबत पक्षातील जुने नेते उभे राहिले असते तर पक्षातील कार्यकर्त्यांना वेगळा संदेश गेला असता. मी गिरीश महाजन यांच्यावर अजिबात नाराज नाही. त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केले गेले आहे. काही दलाल ज्यांचा आपल्याच घरात उमेदवारी मिळावी या स्वार्थातून आजचे राजकारण झाले आहे.
हे देखील वाचा : Nashik Politics : मनसेने दिनकर पाटलांची तर ठाकरेंच्या शिवसेनेने यतीन वाघ, विनायक पांडेंची केली हकालपट्टी




