Tuesday, January 6, 2026
HomeनाशिकNashik BJP Politics : 'त्यांचा' पक्षांतर्गत विरोधकांना इशाराच कारणीभूत; नेमकं काय घडलंय?

Nashik BJP Politics : ‘त्यांचा’ पक्षांतर्गत विरोधकांना इशाराच कारणीभूत; नेमकं काय घडलंय?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आ. राहुल ढिकले (MLA Rahul Dhikale) यांना नाशिकमधील भाजप उमेदवार निवड समितीच्या प्रमुख पदावरून हटवण्यामागे त्यांचा पक्षांतर्गत विरोधकांना दिलेला गर्भित इशाराच कारणीभूत असल्याची चर्चा कायम आहे. मात्र, अचानक नेतृत्व बदलल्याने भाजप कार्यकर्त्यांसह (BJP Workers) विरोधक ही बुचकळ्यात पडले आहेत.

- Advertisement -

शहरातील ज्येष्ठ आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांना डावलत आ. राहुल ढिकले यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतरच नाशिकच्या राजकारणात (Politics) त्यांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले होते. ढिकले यांच्या नेतृत्वाखाली भाजपने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा पहिला टप्पा पूर्ण केला होता. मात्र, महापालिका निवडणुकांच्या तोंडावर एका उ‌द्घाटन कार्यक्रमात आ. ढिकले यांनी पक्षांतर्गत विरोधकांवर जहरी टीका केली होती. आजारी असतानाही माझ्याविरोधात काम करणाऱ्यांना, माझी रॅली अडवणाऱ्यांना असमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. ढाक लावून आसमान दाखवले नाही तर ढिकले नाही, असा इशारा त्यांनी दिला होता.

YouTube video player

निवडणूकप्रमुखच जाहीरपणे असा गर्भीत इशारा देत असल्याने ढिकले विरोधकांनी त्याचे पुरेपूर भांडवल केले. त्यांनी आपले कसब पणाला लावून ढिकले यांच्या वक्तव्याचा पक्षावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा संदेश वरिष्ठ नेत्यांपर्यंत नेला अशी कुजबूज भाजपमध्ये सुरू होती. त्यात आ. फरांदे यांचे वरिष्ठ पातळीवरील त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कामास आले. निवड समिती असली तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंहस्थ मेळामंत्री गिरीश महाजनच (Girish Mahajan) घेतील, अशीही चर्चा आहे. महापालिका निवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शुक्रवारी (दि.१९) आ. फरांदे यांचा सत्कार झाला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन महापालिका निवडणुकीत भाजपला यश मिळवून देऊ, असे स्पष्ट केले.

तर ढिकले यांनीही संयमित प्रतिक्रिया देत, भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाईल ती पार पाडेन. आमदार आदेशानुसार जी जबाबदारी दिली देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखाली काम करेन, असे म्हटले. नाशिक महानगरपालिका निवडणूक व्यवस्थेचा भाग म्हणून अजून एक संघटनात्मक पद तयार करण्यात आले आहे. तर आता आमदार राहुल ढिकले व आमदार देवयानी फरांदे या दोघांवर नाशिक महानगरपालिका निवडणूक (Nashik NMC Election) जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत वर्तमान पत्रे व टीव्ही चॅनलवर आलेल्या उलटसुलट बातम्यांमध्ये तथ्य नाही, असे भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी म्हटले आहे.

युतीबाबत संभ्रम

वरिष्ठ पातळीवर जरी महायुती म्हणूनच निवडणुका लढवल्या जातील असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर गणित वेगळे आहे. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनीच ‘युती नको, आपण स्वतंत्र लढू’ या कार्यकर्त्यांच्या व इच्छुक उमदेवारांच्या भावना वरिष्ठांना कळवल्या आहेत. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आता पक्षाकडे सर्व जागांवर सक्षम उमेदवार असल्याने युती करू नये, अशी भूमिका घेतल्याने भाजप-शिवसेना (शिंदे गट) संभाव्य युतीला सुरुंग लागला आहे.

वंदना मनचंदा भाजप कार्यालयात

गेली अनेक वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या माजी नगरसेविका वंदना मनचंदाही आता भाजपत दाखल झाल्या आहेत. त्यांनी शुक्रवारी पक्ष कार्यालयात येऊन आगमी निवडणुकीबाबत उमेदवारीसाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केली. काँग्रेसमधील जे जे पदाधिकारी हमखास विजयी होतात अशा उमेदवारांवर भाजपने आता लक्ष्य केंद्रित केले असून, त्यांना गोंजरण्याचे काम सुरू झाले आहे. काहीही करून शंभर प्लसचा नारा यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

ताज्या बातम्या

बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी

0
सटाणा | बागलाण तालुक्यातील ताराहाबाद, नामपूर, ढोलबारे, वीरगाव व परिसरात आज सायंकाळच्या दरम्यान अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल...