निफाड | प्रतिनिधी | Niphad
जमिनीच्या (Land) हद्दी खुणा दाखवून नकाशा काढून देण्याच्या मोबदल्यात भूमि अभिलेखचे अधीक्षक आणि स्वत:साठी चार लाखांची लाच मागून साडेतीन लाख रुपये स्वीकारताना भूमी अभिलेखच्या शिपायास (Land records officer) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,’नितेंद्र काशिनाथ गाढे (रा.निफाड) असे या शिपायाचे नाव आहे. तक्रारदार यांच्या मावशीची मौजे दीक्षी तालुका निफाड (Niphad) येथे शेतजमीन असून, ही शेतजमीन मोजणीसाठी त्यांनी भूमी अभिलेख कार्यालय निफाड येथे दि. २५ जानेवारीला अर्ज केला होता. तक्रारदार यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या जमिनीची भूमी अभिलेख कार्यालय यांच्यामार्फत दि.२८ फेब्रुवारीला मोजणी झाली होती. परंतु, हद्दी खुणा दाखवायच्या बाकी होत्या.
यानंतर शिपाई गाढे यांनी भूमी अभिलेखचे उपअधीक्षक भाबड यांच्या ओळखीचा तक्रारदार (Complainant) यांच्यावर प्रभाव पाडून भाबड यांच्याशी बोलून हे काम दिलेल्या तारखेस दि.०७ मार्च २०२५ रोजी हद्दी खुणा दाखवून व नकाशा काढून काम पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात दि.०६ मार्च रोजी स्वतःसाठी व भाबड यांच्या नावे ४ लाख रुपये लाचेची मागणी केली. मात्र, तडजोड करून ती रक्कम साडेतीन लाख रुपये झाली. याबाबत तक्रारीनुसार सापळा रचण्यात आला असता या लाचेची (Bribe) रक्कम काल स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले.
दरम्यान, ही कारवाई पोलीस निरीक्षक मीरा कौतिका वसंतराव आदमाने, पोलीस हवालदार पंकज पळशीकर, पोलीस हवालदार प्रमोद चव्हाणके यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर-घारगे (Sharmishtha Walawalkar-Gharge) यांच्या मार्गदर्शनाखाली केली.