नाशिक | प्रतिनिधी | Nashik
हॉस्पिटलच्या अपॉईंटमेंटसाठी ‘जस्ट डायल’ वरून मिळविलेल्या एका संशयास्पद क्रमांकावर संपर्क साधल्याने शहरात सायबर फसवणुकीचा (Fraud Crime) गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अपॉईंटमेंटसाठी महिलेने घाईगडबडीत ‘डायल केलेल्या नंबरवरुन बोलणाऱ्या संशयिताने तिच्या व्हाटस् अॅपवर ‘एपीके’ फाईल पाठवून मोबाईलचा अॅक्सेस मिळवित बँकखात्यातून १ लाख ३९ हजार रुपये परस्पर काढून घेतले आहेत. याच स्वरुपाच्या दुसऱ्या घटनेत आडगाव येथील व्यक्तिस ‘ई-चलान’च्या नावे एपीके फाईल पाठवून ८८ हजार रुपयांची फसवणूक केली. या दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात (Aadgaon Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनेत तक्रारदार ज्योती पंडितराव गिते (रा. पार्क साईड होम्स, बळीमंदिराजवळ, आडगाव शिवार) यांनी फिर्याद दिली असून १८ ऑक्टोबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत हा प्रकार घडला. त्यांनी पिंप्रीकर हॉस्पिटलमधील उपचारासाठी ‘अपॉईंटमेंट मिळविण्यासाठी ‘गूगल सर्च’ करुन जस्ट डायलवर नंबर शोधला. घाईत मिळालेल्या एका नंबरवर कॉल केला असता, काही वेळाने गिते यांच्या नंबरवर संशयिताने ९३४१६७०१३४ या क्रमांकावरुन ‘कॉल करीत पिंप्रीकर हॉस्पिटलमधून बोलत आहे, असे सांगून टोक्नसाठी गिते यांच्या हॉट्सअॅपवर संशयिताने ९३०४६६८१८० या नंबरवरुन ‘एपीके फाईलसह लिंक पाठविली. या लिंकवर सर्व माहिती भरावयास सांगितली.
त्यानंतर सायंकाळी त्यांच्या बँक खात्यातून संशयिताने (Suspected) ऑनलाईन व्यवहार करीत १ लाख ३९ हजार रुपये आयएमपीएसद्वारे ट्रान्स्फर करुन फसवणूक केली. तर, याच कालावधीत दुसऱ्या घटनेत तक्रारदार महेंद्र उत्तम कापसे यांना संशयितांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यासंदभनि ‘ई-चलान’ चा मेसेज पाठविला. त्यात दिलेल्या एपीके फाईलवर क्लिक करताच मोबाईल ‘हॅक’ करून त्यांच्या बँक खात्यातून ८८ हजार रुपये काढून घेतले. दोन्ही प्रकरणांत एकूण २ लाख २७ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाली आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक उमेश पाटील करत आहेत.
एपीके फाईल म्हणजे?
‘एपीके फाईल म्हणजे अँड्रॉइड अॅप्लिकेशनची इन्स्टॉलेशन फाईल आहे. ती कुठूनही पाठवली गेली असल्यास अत्यंत धोकादायक ठरते’. एकदा ही फाईल इन्स्टॉल झाली की ती ‘स्क्रीन रेकॉर्डिंग, ओटीपी, पीन, पासवर्ड, बँकिंग अॅप्सचा वापर, कॉल व मेसेजचा ‘ऑटो अॅक्सेस’ घेऊन मोबाईल पूर्णपणे ताब्यात घेते. त्यामुळे एपीके फाईल्स अजिबात इन्स्टॉल करू नयेत.
एक कोटी ७७ लाख रुपये उकळले
‘शेअर मार्केटमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी शहरातीस तिघांकडून तब्बल १ कोटी ७७ लाख रुपये उकळले आहेत. याबाबत शहर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऑगस्ट २०२५ ते ७नोव्हेंबर २०२५ दरम्यान संशयित) अनया वर्मा, वंशिका गिल, नाविशा सन्यमसह इतरांनी तक्रारदारांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्याला बळी पडून तक्रारदारांनी संशयितांच्या वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे वर्ग केले. परतावा मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे उघड झाले. तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.
ठळक मुद्दे
- गुगल किंवा ‘जस्ट डायल’वरून मिळालेला नंबरही बनावट असू शकतो
- ‘ई-चलान’ किंवा अपॉईंटमेंटच्या नावाखाली सायबर सापळा
- एकाच पॅटर्नवर दोन वेगवेगळ्या फसवणुका





