नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे (Shivaji Chumbhale) यांच्या पुत्राच्या बेलतगव्हाण येथील कार्यालयावर जमावाने तोडफोड करीत लॉकरमधील पावणे दोन लाखांची रोकड दरोडा टाकून पळवली. याप्रकरणी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात नुकताच पक्ष प्रवेश केलेला सराईत पवन पवार (Pawar Pawar) याच्यासह पाच संशयितांविरोधात दरोड्याचा गुन्हा देवळाली कॅम्प पोलिसात (Police) दाखल करण्यात आला आहे. ही घटना आठवडाभरापूर्वी घडली असून तिला अनेक आर्थिक व्यवहार व राजकीय कंगोरे असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
हे देखील वाचा : World AIDS Day : नाशिक जिल्ह्याची एड्समुक्तीकडे वाटचाल
पवन पवार, विशाल पवार, रामेश्वर पटेल, युवराज मोरे, नाना पगारे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. प्रताप शिवाजी चुंभळे (३४, रा. पांडुरंग निवास, लेखानगर, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची भागीदारीमध्ये महावीर एन्टखाईजेस् कंपनी असून, बेलतगव्हाण येथील कंपनीच्या आवारातील कार्यालयाचे काम सुरू होते. कार्यालयात सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू होते. २२ तारखेला रात्री सव्वा सात वाजेच्या सुमारास संशयित पवन पवार याच्यासह ५० जणांनी लाठ्या काठ्या घेऊन जाऊन बंगाल्यासमोर येत सुरक्षारक्षकांना दमदाटी केली.
सुरक्षारक्षक अलोक साळवे, दर्शन साळवे यांना शिवीगाळ व मारहाण (Beating) करीत आत प्रवेश केला. त्यानंतर संशयितांनी सीसीटीव्हीचे काम करणाऱ्या हार्दिक शहा यासही मारून टाकण्याची धमकी देत हाकलून दिले. यानंतर संशयितांनी कार्यालयातील वस्तूंची तोडफोड करीत, कार्यालयातील टेबलच्या ड्रॉवरमधील १ लाख ७० हजारांची रोकड चोरून नेली. अशा रितीने संशयितांनी तोडफोड व चोरी करीत २ लाख ४७ हजार ७०० रुपयांचे नुकसान केले. देवळाली कॅम्प पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक देवरे तपास करीत आहेत.