नाशिक | प्रतिनिधी | Nashik
पंचवटीतील रासबिहारी-मेरी लिंकरोडवरील कोट्यवधी रुपयाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा करून मूर्तिकार मालमत्ताधारकाला हत्यारांचा धाक दाखवून ५७ लाख रुपयांची खंडणी (Extortion) उकळली. याप्रकरणी शिवसेनाप्रणीत श्रमिक रिक्षा चालक-मालक युनियनचा कार्याध्यक्ष भगवंत ऊर्फ बाळासाहेब पाठक याच्यावर म्हसरूळ पोलिसात (Mhasrul Police) गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे याच गुन्ह्यात सुनील बागुलांचा पुतण्या अजय व कट्टर समर्थक मामा राजवाडे यांचेही नाव नमूद आहे.
संशयितांचा (Suspected) शोध सुरू असून राजवाडेसह बागुल हे पूर्वीच नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत.या गंभीर गुन्ह्यात संजय राजाभाऊ राठी, महेश संजय राठी (रा. गंगापूररोड, नाशिक), मामा राजवाडे, अजय बागुल, मीना लोळगे, प्रतीक लोळगे, प्रतीकचा भाऊ, बाळासाहेब पाठक व इतर बारा संशयितांचा सहभाग दाखल फिर्यादीनुसार समोर येत असून आता म्हसरूळ पोलीस बागुल व राजवाडेव्यतिरिक्त इतर संशयितांच्या अटकेसाठी प्रयत्न करत आहेत.
चंदन गोटीराम भोईर (४०, रा. सरस्वतीनगर, कृषी महाविद्यालयाशेजारी, धात्रक फाटा) यांच्या फिर्यादीनुसार ते मूर्तिकार असून त्यांची सरस्वतीनगरात कोट्यवधी रुपये मूल्याची जमीन (Land) आहे. दरम्यान, १६ मार्च ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत संशयितांनी भोईर यांच्या घराच्या कंपाऊंडमध्ये लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनिशी जबरीने प्रवेश केला व जबरीने पत्र्याचे शेड तसेच मालकी हक्काचा बोर्ड तोडून त्यांना व कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन प्लॉटचा कब्जा घेतला, असे फिर्यादीत नमूद आहे. तपास सहाय्यक निरीक्षक उमेश बोरसे करत आहेत.
दोन कोटींची खंडणी मागितली
संजय राठी, प्रतीक लोळगे याने वरील कालावधीत भोईर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. परंतु तो वार चुकला व कुटुंबियांनी त्यांचा जीव वाचवला. यानंतर संजय राठी, महेश राठी व साथीदारांनी संगनमत करून भोईर यांच्याकडून सुमारे ५७ लाख रुपयांची खंडणी उकळली. यावर न थांबता भोईर कुटुंबाला संजय राठी, महेश राठी, अजय बागुल, मामा राजवाडे, बाळासाहेब पाठक व इतर गुंडांनी भीती दाखवून भोईर यांची जमीन त्यांच्या इच्छेविरुद्ध तडजोड पत्र अर्थात सुलेनामा करून घेतला. त्यानंतर बागुल, पाठकव राजवाडेसह इतरांनी भोईर यांच्या जागेवरील कब्जा सोडण्यासाठी कोटी रुपयांची खंडणी मागितली. हे पैसे न दिल्यास ‘कुटुंबाला संपवून टाकू व कब्जा कायमस्वरुपी स्वतःकडे ठेवण्याची धमकी दिली.
रिक्षाचालकांना दुहेरी दणका
याआधीच भाजप नेते व शिवसेनेचे तत्कालीन नाशिक जिल्हाप्रमुख सुनील बागुल यांचे कट्टर समर्थक असलेले मामा ऊर्फ बाबासाहेब राजवाडे व पुतण्या अजय बागुल विसेमळा गोळीबार कांडानंतर पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत. आता सुनील बागुलांचा अतिनिष्ठावान भगवंत खंडणीसह गंभीर गुन्ह्यात सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे पाठकाचे नाव एफआयआरमध्ये आल्याने त्यांना अटक होणार असून या अटकेचा फटका शहरातील रिक्षा लॉबीवर होणार आहे. बहुतांश सराईत व इतर रिक्षाचालक पाठकांना आपला ‘आका’ समजतात. मात्र, आता आकाचेच पळण्याचे वांदे झाल्याने रिक्षाचालक धास्तावले आहेत.
ठळक मुद्दे
- ५७ लाखांची खंडणी उकळली
- राठी बंधू बांधकाम व्यावसायिक
- भूमाफिया राजपूतच्या मंडलिक हत्याकांडानंतर सर्वात मोठे भोईर कब्जाकांड उघड
- लोळगे कुटुंबाचा सहभाग, महिलेचे नाव निष्पन्न
- अजय व मामाला पुन्हा होणार अटक
- पाठक रिक्षा युनियनचा सक्रिय पदाधिकारी
- जमीन खरेदी-विक्रीतही बसवला जम
- पाठकची हिस्ट्री काढली; घरझडती होणार




