नाशिक | प्रतिनिधी | Nashik
बनावट दस्तऐवज तयार करून वडिलोपार्जित शेतजमिनीवर कब्जा करत ७५ लाख रुपये खंडणी (Extortion) मागून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लोंढे गँगवर (Londhe Gang) गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला.
संतोष संतू वाघ (४६, व्यवसाय रिक्षाचालक, रा. उत्कर्ष नगर, महाराष्ट्र पोलीस अॅकेडमीसमोर, त्र्यंबकरोड, नाशिक) यांची वडिलोपार्जित शेतजमीन (Farm Land) संशयित बांधकाम व्यावसायिक ईश्वरभाई शिवगण मावाणी (रा. ओमकार बंगला, विधाते नगर, हिराबाडीरोड, पंचवटी), प्रकाश लोंढे, दीपक लोंढे, भूषण लोंढे, दीपक रतन मटाले (रा. कामटवाडे) व गणेश पंडित चव्हाण यांनी संगनमत करून बनावट दस्ताऐवज तयार केले.
संशयितांनी (Suspected) सुरेश वाघ यांची कोणतीही संमती न घेता त्यांची महिरावणी, त्र्यंबकेश्वर येथील सर्वे नंबर २३३ मधील दुसरा हिस्सा गट नंबर ४४८ मधील वडिलोपार्जित शेतजमिनीवर कब्जा केला. त्यानंतर वाघ यांना महात्मानगर येथील हॉटेल राधिकाजवळ बोलावले. कब्जा केलेली जमीन परत देण्याकरता व न्यायालयीन दिवाणी दावा परत घेण्याकरता ७५ लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. संशयितांनी त्यावेळी वाघ यांच्याकडून २० हजार रुपये बळजबरीने घेतले.
दरम्यान, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात (Gangapur Police Station) खंडणी व जमीन बळकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील संशयित ईश्वरभाई मावाणी व दीपक रतन मटाले यांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणातील इतर संशयित प्रकाश लोंढे, दीपक लोंढे हे न्यायालयीन कोठडीत असल्याने त्यांचा लवकरच ताबा घेतला जाणार आहे. तर यातील संशयित भूषण लोहे अद्याप फरार आहे. याप्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक भटू पाटील करत आहेत.




