नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik
सातपूर ऑरा बार गोळीबार (Satpur Aura Bar Firing Case) आणि अंबड येथील पुष्कर बंगला बळकावून खंडणी प्रकरणातील संशयित निखिल कुमार निकुंभ याला अंबड गुन्हे शोध पथकाने (Ambad Crime Investigation Team) ठाणे येथील मीरा-भाईंदर परिसरातून सापळा रचत ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, संशयित निखिल निकुंभ याच्यावर नाशिक शहरातील अंबड, सातपूर, सरकारवाडा, नाशिकरोड, घोटी आणि त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यांमध्ये विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याच्यावर सातपूर ऑरा बार येथे गोळीबार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच अंबड पोलीस ठाण्यात खुटवड नगर येथे बळजबरीने बंगला बळकावून खंडणी मागितल्याचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.
अंबड गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार भूषण सोनवणे व भगवान जाधव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार,संशयित हा मीरा-भाईंदर परिसरात लपल्याची माहिती मिळाली. तत्काळ पथकाने ठाण्यातील त्या भागात सापळा रचत संशयित निखिल याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला पुढील तपासासाठी सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, ही कामगिरी अंबड पोलीस ठाणे (Ambad Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्विंद्रसिंग राजपूत,उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, सुहास क्षिरसागर, प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, भगवान जाधव, चारूदत्त निकम , सविता कदम यांनी केली.




