नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नियमबाह्य पद्धतीने दुचाकीवरुन प्रवासी वाहतुक करणाऱ्या ‘रॅपिडाे’ अर्थात राेप्पेन ट्रान्स्पाेर्ट कंपनीच्या संचालकावर नाशिकमध्ये (Nashik) पहिला गुन्हा (Case) नाेंद झाला आहे. नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाने यासंदर्भाने पंचवटी पाेलिसांत फिर्याद नाेंदविली असून रॅपिडाेवर महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात गुन्हेसंकट अधिक गडद झाले आहे.
सरकारी नियमांना तिलांजली देऊन बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रॅपिडो, उबेर यासारख्या ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी राज्य परिवहन विभागाला (Department of Transport) दिले हाेते. त्यानुसार, कधी नव्हे ते परिवहन विभाग झाेपेच साेंग साेडून हिरीरीने कामाला लागला आहे. सरकारने ई-बाइक धोरण नुकतेच जाहीर केले असून अनेक ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांनी व्यवसाय सुरू केला आहे.
तथापि, चालकांना (Driver) नियमावली व प्रवासी सुरक्षिततेसंबंधी कोणतेही प्रशिक्षण न देता त्यांची नेमणूक करून त्या खासगी अथवा साध्या बाइकद्वारे प्रवासी सेवा देत आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. एका प्रवाशाचा अशा अवैध बाइक टॅक्सीने जाताना मृत्यू झाला असून ही घटना ताजी असताना हे ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्या शासनाच्या नियमावलीची पायमल्ली करून बेकायदेशिर व्यवसाय करत आहेत.
निकष, नियम पाळा
प्रवाशांची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्य चालकांचे शोषण न करता नियम व सुरक्षिततेचे निकष पाळून व्यवसाय करणे अपेक्षित आहे. परंतु चालकांचा गैरफायदा घेऊन बेकायदेशिररीत्या शासकीय नियमांची पायमल्ली करून प्रवाशांचा जीव धोक्यात आणणाऱ्या ॲप आधारित बाइक टॅक्सी कंपन्यांवर यापुढेही अशीच धडक मोहीम सुरुच राहणार आहे. विशेष म्हणजे ज्या ‘दुचाकी’ अशाप्रकारे बेकायदेशीर वाहतूक करताना आढळतील तेवढे गुन्हे संबंधित चालकावर दाखल न करता त्या ॲपच्या मालकावर दाखल केले जात आहेत.
नाशिकमधील गुन्हा असा
नाशिक आरटीओ कार्यालयातील माेटार वाहन निरीक्षक योगेश गोरक्षनाथ सापिके यांच्या फिर्यादीनुसार, रॅपिडाे कंपनीस प्रादेशिक परिवहन विभागाने बाईक टॅक्सीला (पेट्रोल इंजिन दुचाकी) आजतागायत काेणताही परवाना, लायसन्स दिलेले नाही. तरीही कंपनीने नाशिक शहरात बाईक टॅक्सी विनापरवानगी ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून बेकायदेशिर प्रवासी वाहतूक करून प्रवाशांकडून आर्थिक फायदा करुन घेतला आहे. याद्वारे शासनाची फसवणूक हाेत असून कंपनीच्या संचालकाविरुद्ध ही फिर्याद दिल्याचे नमूद आहे. तपास पाेलीस निरीक्षक सुनिल पवार करत आहेत.
नफ्यासाठी खासगी वाहनांचा वापर
नाशिक आरटीओच्या तपासणीत ‘रॅपीडो’ कंपनीने ‘राइीड’ शेअरिंगच्या नावाखाली प्रवाशांची वाहतूक केली. विशेष म्हणजे कंपनीने प्रवासासाठी वापरलेली वाहने ही खासगी मालकीची असून मोटार वाहन कायद्यानुसार, खासगी वाहने प्रवासी वाहतुकीसाठी वापरण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही, कंपनीने नफा मिळवण्याच्या उद्देशाने या नियमांचे उल्लंघन केल्याचे समाेर आले आहे.




