नाशिक | प्रतिनिधी | Nashik
‘निवडणुकीत पैसे वाटप करण्यासह जास्तीचे पैसे देतो’, असे आमिष दाखवून प्रकाश लोंढे गँगने (Prakash Londhe Gang) मेडिकल चालकाचे तीस लाख रुपये हिसकावून त्याला धावत्या कारमधून फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. सहा वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकाराची फिर्याद अखेर कायद्याच्या बालेकिल्ला मोहिमेनुसार सातपूर पोलिसांत (Satpur Police) दाखल झाली असून मोक्का कारवाई झालेल्या लोंढे गँगच्या अडचणीत दिवसागणिक वाढच होत आहे.
विनोद सुखलाल मुनोत (५०, रा. तेली गल्ली, मनमाड, ता. नांदगाव) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित प्रकाश लोंढे व त्याच्या साथीदार केतन भुजबळ, रुपेश पवार, गौरव देशमुख, प्रशांत धनेधर, नाना लोंढे व अन्य तीन ते चार अनोळखींनी मुनोतसह योगेश जाधव यांची तब्बल ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे नमूद आहे. याच प्रकरणात (Case) गावठी कट्याचा धाक दाखवत मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असाही दावा करण्यात आला असून २१ एप्रिल २०१९ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास सातपूर एमआयडीसी येथे ही घटना घडली होती.
मुनोत यांचे मेडिकल असून संशयितांनी (Suspected) त्यांच्या मेडिकलमध्ये येऊन प्रकाश लोंढे यांना निवडणुकीत पैसे वाटप करण्यासाठी कमी दराच्या नोटा हव्या असल्याची मागणी केली. तसेच या नोटांऐवजी जास्त दराच्या नोटा देणार असल्याचे व मूळ रक्कमेच्या १० टक्के रक्कम देणार असल्याचे आमिष दाखविले. संशयित केतन भुजबळ याच्या कारमधून (एमएच १५ एफएन १२३७) प्रकाश सातपूर एमआयडीसीतून जात असताना, त्यांनी बोलावून घेतले. केतनने गावठी कट्टा लावून ठार मारण्याची धमकी दिली.
तर, रूपेश पवार याने चाकू काढून योगेश जाधव याला देखील मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संशयितांनी धक्काबुक्की तसेच मारहाण करीत, मुनोत यांच्या हातातील ३० लाखांची पिशवी जबरदस्तीने हिसकावली. दरम्यान, तेव्हाच संशयित भुजबळ व पवार यांनी कारचे दोन्ही दरवाजे उघडून मुनोतसह जाधव यांना लाथ मारून कारमधून ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही बाब जेव्हा प्रकाश लोढ याचा पुत्र नाना लोंढे याला कळाली, तेव्हा त्याने देखील फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली.
कारागृहातील मुक्काम वाढणार
प्रकाश लोंढे याच्यावर एकापाठोपाठ गुन्हे दाखल होत असल्याने, त्याच्या अडचणी वाढत आहेत. सध्या लोंढे नाशिकरोड कारागृहात असून, या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिसांकडून त्याचा पुन्हा ताबा घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सातत्याने गुन्हे दाखल होत असल्याने, लोंढे याचा कारागृहातील मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.




