नाशिक | प्रतिनिधी | Nashik
भद्रकाली पोलीस ठाण्याच्या (Bhadrakali Police Station) दुय्यम निरीक्षकाची इंदिरानगर पोलीस ठाण्यात प्रभारीपदी नेमणूक करण्यासाठी पस्तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे.
याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यातील (Nashik Road Police Station) अंमलदाराने मुंबई नाका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन दोन संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालयात खळबळ उडाली आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील व अंबड पोलिसांत (Ambad Police) पूर्वाश्रमी विशेष जबाबदारी सांभळलेल्या अंमलदाराच्या फिर्यादीनुसार संशयित नितीन सपकाळे व सागर पांगरे-पाटील या दोन संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
२४ जुलै रोजी संशयित सपकाळे याने पाटीलसोबत असताना अंमलदाराला ‘व्हॉटसअॅप कॉल’ केला. तेव्हा संशयिताने
वरपर्यंत आपली ओळख असून, भद्रकालीचे कार्यरत दुय्यम निरीक्षकांची इंदिरानगर पोलीस ठाण्यात ‘वरिष्ठ निरीक्षक’ पदावर बदली करुन देतो. त्यासाठी प्रत्यक्ष भेटून बोलू, असे सांगितले. २५ जुलै रोजी सकाळी सपकाळे हा चांडक सर्कल भागात आला. त्याने अंमलदारासह निरीक्षकांना बोलावून घेतले.
त्यावेळी संशयित पाटील याने काही अंतर गाठल्यावर ‘तुम्ही पैसे दिले नाही तर मी कोठेही योग्य बदली होऊ देणार नाही’, असे सांगितले. तेव्हा सपकाळेच्या मोबाईलवर अंमलदारने फोन (Phone) करुन ‘रेकॉर्डिंग’ केली. तेव्हा ‘दूसरे निरीक्षक पस्तीस द्यायला तयार आहेत. मी पाच की करतो. तिसपेक्षा कमी होणार नाही. जर साहेब पंचवीसच्या वर द्यायला तयार नसतील तर बदलीचे काम होणार नाहीं’, असा दावा सपकाळेने केला.
त्यावरुन अंमलदाराने फिर्याद दिली आहे. या प्रकारानंतर मुंबई नाका पोलिसांनी (Mumbai Naka Police) एका संशयिताला ताब्यात घेतले. या प्रकाराबाबत पोलीस आयुक्तालयाने गोपनीयता बाळगली असून, पोलीस दलातील काहीजण याप्रकरणात सहभागी आहेत का, यासंदर्भातही तपास सुरु झाल्याचे समजते. काही ठराविक अधिकाऱ्यांच्या मर्जीतल्या अंमलदाराला संपर्क साधला जाणे, संशयितांना भेटण्यासाठी जाणारे अंमलदारही मर्जीतले असणे, हा प्रकारही संशयास्पद असल्याने आयुक्तालयाने कार्यवाही सुरु केल्याचे कळते.
‘हा माझा अन् तुझा’
पोलीस आयुक्तांनी महिन्याभरापूर्वीच सात ‘प्रभारी’ निरीक्षकांची बदली केली आहे. त्यानुसार नवीन निरीक्षकांनी पोलीस ठाणेनिहाय कामगिरींना सुरुवात केली असून अंमलदारांच्याही बदल्यांची ‘सेटिंग’ अद्याप सुरू आहेत. त्यातच गुन्हे शाखा, पथकांतील ‘कलेक्टरां’ मध्ये झालेले मतभेद थेट उघड होत आहेत.





