नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात गेल्या दहा महिन्यांत घडलेले खुनानंतर (Murders) गुन्हेगारी नियंत्रणासाठी (Criminal Control) शहर पोलिसांनी ऑपरेशन ‘क्लिनअप’ सुरु केले आहे. त्यानुसार, अनेक गुन्हेगार ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणत कायद्यासमोर सरेंडर करीत आहेत.
राजकीय नेते व पदाधिकाऱ्यासह त्यांचे अभय असलेल्या सराईतांसह समर्थकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. त्यातच, सराईत पवन पवार, विशाल पवार, राकेश आण्णा कोष्टी, मुकेश शहाणे, महाबली विक्रम सुदाम नागरे, योगेश ऊर्फ गणेश शेवरे, व्यंकटेश आण्णा मोरे आदी भूमिगत झाले आहेत.
शहरातील वाढते गोळीबार (Firing) खून व अन्य स्वरुपाची गुन्हेगारी नियंत्रित करण्यासाठी शहर पोलिसांनी (Police) ‘विशेष’ मोहिमा सुरु केल्या आहेत. यात ‘राजाश्रय’ लाभलेल्या विविध टोळ्या निशाण्यावर घेऊन पुराव्यांनुसार त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. यात हप्ते वसुली, दहशत माजविणे, गोळीबार व खून करणारे रडारवर घेण्यात आले आहेत.
यात बेकायदेशिररित्या बॅनरबाजी करुन सर्वसामांन्यांच्या मनात ‘धाक’ निर्माण करणाऱ्या राकेश कोष्टी, पवन पवार, विक्रम नागरे, योगेश शेवरे, विशाल पवार आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याच गुन्ह्यात अनेकांना ताब्यात घेतले जाणार असून प्रसंगी अटकही केली जाणार आहे. याच धाकाने अनेकांनी पलायन केले असून काहींनी कुटुंबासह पळ काढल्याचे पोलिसांच्या पाहणीत आढळले आहे.
नागरे व शेवरेची पार्श्वभूमी
सराईत गुंड जया दिवे याचा समर्थक व मित्र अनिरुद्ध शिंदे याने काही महिन्यांपूर्वी इगतपुरीतील मूळगावी आमदार सीमा हिरे यांचा समर्थक व भाजपचा तत्कालिन नगरसेवक मुकेश शहाणे आणि भाजप कामगार आघाडीचा पदाधिकारी विक्रम सुदाम नागरे याच्या जाचास कंटाळून आत्महत्या करुन सुसाईड नोट लिहिली होती. याबाबत नागरे व शहाणेवर गुन्हा दाखल आहे. दोघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. नागरेला काही महिन्यांपूर्वीच न्यायालयाने धनादेश न वटल्याच्या एका प्रकरणात तीन महिन्यांचा तुरुंगवास व २९ लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली होती. नागरे व शेवरे ‘खास’ मित्र असून त्यांच्यावर खंडणी, लूट, बेरोजगारांचे टोळके सोबत फिरवून दहशत माजवणे व भय निर्माण केल्याच्या तक्रारी दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेवरे हा मनसेचा पदाधिकारी असून त्याने महापालिकेत प्रभाग सभापती व नगरसेवकपद भूषवले आहे.
राकेश कोष्टीही पसार
दहशत माजवण्यासाठी खळबळजनक तसेच धमकीचे ‘रिल्स’ व्हायरल केल्याबाबत दाखल गुन्ह्यानंतर, सराईत गुंड राकेश आण्णा कोष्टी पसार झाला आहे. राकेश हा सध्या मुकेश शहाणेचा ‘राईट हॅन्ड’ म्हणून सिडकोत कुप्रसिद्ध आहे. त्याच्यावर खून, दरोडा, प्राणघातक हल्ल्यासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला एका खुनात शिक्षाही ठोठावण्यात आली आहे. मात्र, आता तो जामिनानुसार कारागृहाबाहेर आला आहे. मात्र, सध्याच्या ‘ऑपरेशन क्लिनअप’मुळे तो पसार झाला आहे.




