नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहर पोलीस आयुक्तालयाच्या (City Police Officer) सायबर सेलला फाईल पेंडन्सीचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. पोलीस आयुक्तांच्या सूचनेने उपायुक्तांनी अचानक केलेल्या तपासणीत गेल्या चार ते साडेचार वर्षांपूर्वीचे दहा तक्रार अर्ज धूळखात पडून असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यात दहा नागरिकांना नायजेरिअन फ्रॉड, सेक्स्टॉर्शन व इतर गुन्ह्यांत गोवून तब्बल एक कोटी तेरा लाख रुपये उकळत फसवणूक (Fraud) केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आयुक्तालयाने ही पेंन्डसी आयटी अॅक्टनुसार ‘एक’ गुन्हा दाखल करून मार्गी लावल्याने सायबर पोलीस ठाण्याचे उंबरे झिझवून थकलेल्या तक्रारदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्यात दररोज सायबर गुन्ह्यासंदर्भान एक ते दोन तक्रारी प्राप्त होतात. यात सायबर चोरटे व टँकर नागरिकांना व व्यावसायिकांना धमकावून तसेच पैशांचे आमिष दाखवून ऑनलाईन स्कपात लाखो ते कोटी रुपये उकळतात. त्यानुसार गुन्हे नोंदवून तपास केला जातो. काहीअंशी तपासात प्रगती होत असतानाच, हजारो बँक खात्यांचे जाळे आणि त्यातही बनावट बँकखात्यांमुळे (Bank Account) तपास रखडतो. असे असतानाच, २ डिसेंबर २०२१ ते ३० जानेवारी २०२५ या कालावधीत दहा वेगवेगळ्या तक्रारदारांचे अर्ज स्वीकारून सायबर सेलने ‘रिसिव्ह’ शेरा देत ताब्यात घेतले. पण त्यावर कोणतीही कायदेशिर कारवाई न करता ते खितपत पडून दिले.
दरम्यान, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी पोलीस ठाण्यांसह सर्वच आस्थापनांना झिरो पेंन्डसीचे स्पष्ठ निर्देश देत तत्काळ कार्यवाहीच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत. त्यानुसार, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सायबर सेलच्या कामाचा आढावा घेतला असता दहा तक्रार अर्ज चार वर्षांपासून प्रलंबित असल्याचे समोर आले. त्यानुसार त्यांनी संबंधितांची व तपासाधिकाऱ्यांची कानउघडणी करुन तत्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, दहा तक्रारीच्या अनुषंगाने साडेचार वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशी झाली दहा जणांची फसवणूक
वरील कालावधीत तब्बल २९ सायबर चोरट्यांनी नाशिकमधील काही व्यावसायिक, उद्योजक, सेवानिवृत्त व महिलांना व्हॉट्सअॅप कॉल करुन संपर्क साधला. वेगवेगळ्या मोबाईल नंबर, ईमेल व सोशल मीडियावरुन बोलणाऱ्या सायबर संशयितांनी नानाविध कारणे सांगून या नागरिकांकडून ऑन लाईन एक कोटी तेरा लाख रुपये उकळले. या घटनांत चोरट्यांनी तक्रारदारांना किप्टो करेन्सीतील गुंतवणूकीचे अमिष, सेक्स्टॉर्शन, फेसबुकद्वारे मैत्री करत नाय जेरियन फॉड, लॉटरीचे आमिष, मोबाईल हॅक करून, मोबाईल टॉवर बसवून देण्याचे आमिष, लोन अॅप, कंपनीला ऑनलाईन ऑर्डर देण्याच्या बहाण्यासह इतर कारणांनी पैसे घेत गंडा घातला आहे.
ठळक मुद्दे
- अनेकांनी आमिषाला बळू पडून केली गुंतवणूक
- काहींचे पाच लाख, २५ लाख, ६० लाख, १५ लाख या स्वरुपात पैसे उकळले
- हे गुन्हे उकल होण्याची शक्यता कमीच
- वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख यांच्याकडे तपास
- तक्रारदारांना पैसे परत मिळण्याची आशा धूसर




