Sunday, April 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपडसाद : शिकल्या, संघटित झाल्या अन् संघर्षही केला….

पडसाद : शिकल्या, संघटित झाल्या अन् संघर्षही केला….

सध्याच्या काळातील सर्वात शक्तीशाली मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरीश महाजन यांना थेट लक्ष्य केलेल्या सरकारी कर्मचारी बाईंचे नांव गेल्या दोन दिवसांपासून समस्त महाराष्ट्रात व्हायरल झाले, तेव्हापासून सगळीकडेच चौकशी चालू आहे की कोण आहेत या माधवी जाधव. अगदी पोलिसांच्या गुप्तचर खात्यालाही त्यांच्या प्रेरणांचा शोध घेण्याचे काम मागे लागले. प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव नसल्याने माधवीताईंनी कार्यक्रमस्थळीच दुर्गावतार धारण केला. उपस्थित पोलिस तर अचंबित झाले. माध्यमांना दिवसभराचे खाद्य मिळाले. बघता बघता ताई प्रसिध्दीच्या शिखरावर पोहोचल्या. आजच्या समाजमाध्यमांच्या अतिरेकाच्या जमान्यात माधवीताईंचा हा संताप व त्यांनी थेट महाजन यांनाच केलेले लक्ष्य काही क्षणातच सर्वत्र पसरले.

- Advertisement -

खाकी वर्दीतील कोण या माधवी जाधव अशी पृच्छा सुरु झाली. त्यांचे खाकी वर्दीत असणे हे त्या पोलिस असल्याचे गृहित धरुन सुरुवातीच्या बातम्या दिल्या गेल्या. परंतु नंतर ताईंनी स्वत:च त्या वनखात्यात वनरक्षक पदावर असल्याचे सांगितल्याने गोंधळ टळला. परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस स्थानकात नेल्यानंतर काही क्षणातच तेथे आंबेडकरी विचारांचे शेकडो लोक जमा झाल्याने प्रकरण वेगळेच असल्याचे लक्षात आले. पोलिसांनाही सावध व्हावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांचाही लागलीच माधवीताईंना फोन आला व कोणत्याही प्रकारची मदत करायला आपण तयार असल्याचे त्यांनी सांगितले. हा सर्व प्रकार वेगळ्या दिशेने जात असल्याचे लक्षात आल्यानंतर गिरीश महाजन यांनीही, लागलीच आपला तसा काही उद्देश नव्हता, अनवधानाने उल्लेख राहिला. बाबासाहेबांविषयी आपल्याला नितांत आदर आहे. तरीही झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असे जाहीर केले. परंतु तोपर्यंत भात्यातून बाण सुटला होता. दरम्यान, ताईंनी महाजनांवर ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचा आग्रह धरला.

सुदैवाने अनेकांनी तसे करता येणार नाही, हे सांगितल्यानंतर त्यांनी आग्रह सोडला. परंतु नंतर तो संपूर्ण दिवस प्रजासत्ताक दिनापेक्षाही माधवी जाधव या शासकीय सेवेतील महिलेने केलेले धाडस, हिंमत याचीच चर्चा होत राहिली. नंतर त्यांच्या मुलाखतींचे सत्र चालू झाले. ङ्गडॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे या देशाला घटना मिळाली. त्याप्रीत्यर्थ प्रजासत्ताक दिन साजरा होतो. अशावेळी समस्त महापुरुषांच्या नावांचा जयजयकार केल जातो आणि आंबेडकरांचे नाव मात्र वगळले जातेङ्घ, याविषयी त्यांचा मुख्यत्वे आक्षेप होता. फुले दाम्पत्यांनंतर बाबासाहेब होते म्हणून आज स्त्रिया शिक्षण घेऊन भरारी घेत आहेत. असे असतांना प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्यातच आंबेडकरांना विसरणे हे भयंकर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. वरवर पाहाता त्यात काय विशेष, असेच कोणालाही वाटेल. नव्हे प्रारंभी तशाच प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. अगदी महाजन असे काही करणेच शक्य नाही, असेच लोक बोलत होते. ताईंनी राईचा पर्वत केला, भर कार्यक्रमात असे काही करणे योग्य नाही.

आता त्यांना नोकरीला मुकावे लागेल, अशाही भावना व्यक्त झाल्या. परंतु सुरुवातीपासूनच माधवीताईंनी मी जे काही करते आहे, त्याच्या परिणामांची मला जाणीव आहे, नोकरी जाऊ शकते, मी पोट कसेही भरेन. पण बाबासाहेबांचा असा अवमान सहन करणे शक्य नाही, ही भूमिका कायम ठेवल्याने त्यांचा हा आवेग एका निश्चित अशा विचारांतून आलेला दिसतो. नंतरच्या त्यांच्या मुलाखतींमधूनही त्यांनी त्यांची पुरोगामी विचारधारा स्पष्ट केली. त्यांचे वर्तन शासकीय अटी-शर्तींचा भंग करणारे असल्याने कदाचित त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई देखील होऊ शकेल. पण त्यांनी जो विषय उपस्थित केला आहे, तो अत्यंत ज्वलनशील असून शासनालाही अत्यंत संवेदनशीलतेने तो हाताळावा लागेल. महाजन यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी आता त्यांनी माफी मागावी अशी मागणी पुढे आली आहे. हा आग्रह यापुढे आणखी वाढू शकतो. हल्ली बोलभांड पुढार्‍यांचा वाचाळपणा हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता ते एक सार्वजनिक आपत्तीचे कारण ठरु लागले आहे, याचा यानिमित्ताने प्रत्यय आला. गिऱीश महाजन हे अनुभवी राजकारणी आहेत. त्यांच्याकडून स्वप्नातही अशी घोडचूक संभवत नाही. ते अनवधानानेच झाले असेल, यात शंका नाही.

परंतु बोलण्याच्या ओघात आपण काय करतोय याकडे त्यांच्यासारख्यांनी लक्ष द्यायचे नाही तर कोणी? बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या जीवनविषयक तत्वज्ञानाचा पुरस्कार करीत माधवी ताई व त्यांच्या सहकारी दर्शना सौपुरे यांनी केलेले धाडस कायद्याच्या भाषेत कदाचित कारवाईसही पात्र ठरेल, पण उच्च पदावरील राजकीय पुढार्‍यांना यापुढे बोलतांना हजारवेळा काळजी घ्यावी लागेल, याची रुजुवात मात्र त्या दोघींनीही घालून दिली, हे नाकारता येणार नाही. शेवटी एकच विनंती, सर्व संबंधीतांनी कृपया या विषयाचे आता जातीचा संदर्भ देऊन राजकारण करता कामा नये. आधीच आपली सामाजिक वीण उसवली आहे. यानिमित्ताने ती अधिक वाढू नये एवढीच अपेक्षा..

ताज्या बातम्या

Nashik Crime News : विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या प्रियकरास कोठडी; ‘लव्ह बाइट’...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik नाशिकमधील (Nashik) एका नामांकित इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या आवारात गंभीर प्रकार समोर आला आहे. एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर वारंवार बलात्कार (Rape)...