नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सायबर गुन्हेगारांकडून (Cyber Criminals) सामान्यांना गंडा घालण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढले असताना, नाशिकमध्ये (Nashik) खासगी नोकरदाराकडून बावीस लाखांच्या पॉलिसीच्या नावे तब्बल ९२ लाख ३७ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. इन्श्युरन्स पॉलिसी ङ्गविड्रॉफ करून देतो, असे आमिष दाखवून सायबर संशयितांनी खासगी नोकरदाराची फसवणूक (Fraud) केली. या प्रकरणी नाशिक सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी हा खासगी नोकरदार असून, सन २०२३ पासून ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही फसवणूक झाली. संशयितांनी फिर्यादीस विविध मोबाइल क्रमांकांवरून संपर्क साधत आपण आयजीएमएफमधून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या एचडीएफसी बँकेच्या इन्श्युरन्समध्ये २२ लाख रुपयांची पॉलिसी आहे, ती तातडीने ङ्गविड्रॉफ करता येईल, असे सांगत विश्वास संपादन केला. पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी एनओसी, बाँड चार्जेस, प्रोसेसिंग फी, टॅक्स क्लिअरन्स आदी कारणे पुढे करुन प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या खात्यांवर पैसे भरण्यास प्रवृत्त केले.
संशयितांनी फोन, व्हॉट्सअॅप कॉल्स आणि मेसेजेसद्वारे सातत्याने संपर्क ठेवत मानसिक दबाव टाकला. रक्कम त्वरित भरली नाही, तर पॉलिसी रद्द होईल अशी भीती दाखविली.आमिषाला बळी पडलेल्या फिर्यादीने ऑनलाइन माध्यमातून विविध बँक खात्यांमध्ये एकूण ९२ लाख ३७ हजार २ रुपये वर्ग केले. मात्र, एवढी रक्कम भरूनही पॉलिसीची कोणतीही रक्कम खात्यात जमा झाली नाही. त्यानंतर संशयितांचे (Suspected) फोन बंद झाले, तसेच संपर्क खंडित झाला.
दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने सायबर पोलिसांकडे (Cyber Police) धाव घेतली. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम, माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. पोलीस निरीक्षक संजय पिसे हे तपास करीत असून, संशयितांचे मोबाइल क्रमांक, बँक खातेधारक, डिजिटल ट्रान्झेंक्शन ट्रेल यांच्या आधारे तपास सुरू आहे.
खातरजमा करा
इन्श्युरन्स, गुंतवणूक, पॉलिसी विड्रॉ यासंदर्भातील कोणत्याही फोन कॉलवर विश्वास ठेवू नये, कोणतीही रक्कम भरण्यापूर्वी संबंधित बँक किंवा अधिकृत कार्यालयाशी प्रत्यक्ष खातरजमा करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी करत सतर्कतेचा इशारा दिला आहे. अनोळखी कॉल्स, लिंक किंवा खात्यांवर पैसे भरण्याचे आवाहन असल्यास सायबर हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.





