नाशिक | प्रतिनिधी | Nashik
सप्टेंबर महिन्याच्या सरते शेवटी नाशिक जिल्हा जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घघाटनासाठी आलेले देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई (CJI Bhushan Gavai) यांच्या नावाचा वापर करुन सायबर चाेरट्यांनी शहरातील ७२ वर्षीय सेवानिवृत्त वयोवृद्धास ‘डिजिटल अरेस्ट’ करून १२ ऑक्टोबर रोजी आरटीजीएसव्दारे तब्बल ७२ लाख रूपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत, शहर सायबर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
दैनंदिन बँक खात्याची माहिती घेऊन अज्ञात सायबर चोरट्यांच्या टीमने गंगापूर रोडवरील (Gangapur Road) वयोवृद्धास २६ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत संपर्क केला. ‘तुम्ही भ्रष्टाचार केला आहे. पुरावे आहेत, आम्हाला लेखापरिक्षण करायचे आहे’, तुम्ही कसे व्यवहार केले?, ही ऑनलाइन नाेटीस स्विकारा आणि माहिती द्या’, असा धाक दाखवित डिजिटल अरेस्ट (Digital Arrest) केले.
तसेच, व्हाट्सॲप कॉल करून बँकेत आधारकार्डव्दारे क्रेडिट कार्ड मार्फतीने गुन्हेगारी स्वरूपाचे आर्थिक व्यवहार झाल्याचे सांगितले. आर्थिक व्यवहार चुकीचे नसतील तर पैसे परत देवू, ते चेक करण्यासाठी सर्व पैसे खात्यावर पाठवा, तीन दिवस घराबाहेर निघू नका, असेही सांगितले. त्यानंतर ‘नाशिक जिल्हा न्यायालयाचा (Nashik District Court) सेटअप’ दाखवत सरन्यायाधीश भूषण गवई बोलत असल्याचे भासून भयभीत केले. त्यानुसार सेवानिवृत्ताची फसवऩूक झाली.





