नाशिक | Nashik
नामांकित कंपनीचे बनावट ॲप वापरून त्याद्वारे शेअर ट्रेडिंग (Share Trading) करण्यासाठी ४१ लाख रुपये गुंतविले असता, ही रक्कम काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंतवणूकदारास (Investor) संशयित सायबर चोरट्यांनी (Cyber Thieves) विविध टॅक्स भरण्याच्या नावाखाली तब्बल सुमारे दीड कोटींना गंडा घातला आहे. शहर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अयन्ना जोसेफ, सेतुरत्नम रवी अशी संशयित सायबर भामट्यांची नावे आहेत. फिर्यादीनुसार, संशयित सायबर चोरट्यांनी नोव्हेंबर २०२४ ते २६ जानेवारी २०२५ या दरम्यान तक्रारदाराशी संपर्क साधला. तेव्हा चोरट्यांनी आदित्य बिर्ला मनी लि. या नामांकित कंपनीचे नाव वापरून बनावट इन्व्हेस्टमेंट ॲप तयार केले. त्या ॲपचा वापर करून तक्रारदारास वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये शेअर खरेदी करण्यासाठी जादा परताव्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला.
त्यानुसार, तक्रारदाराने या ॲपच्या (AAP) माध्यमातून ४१ लाख ६९ हजार ८५१ रुपयांची रक्कम गुंतविली. मात्र त्यातून परतावा मिळत नसल्याने तक्रारदाराने रक्कम काढून घेण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा चोरट्यांनी कॅपीटल गेन आणि सर्व्हिस टॅक्सच्याबाबत आदित्य बिर्ला मनी लि. या कंपनीचे बनावट लेटर हेड असलेली नोटीस तक्रारदाराला ई-मेलला आणि व्हॉटसॲप केली. त्या नोटिसीनुसार तक्रारदाराने (Complainant) ८१ लाख ६१ हजार ८४७ रुपये आणि ७ लाख रुपये भरले.
सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली
वरील रक्कम भरल्यानंतरही त्यांना त्यांच्या मूळ रकमेसह भरलेली अशी १ कोटी ३८ लाख ९ हजार ८५१ रुपये मिळालेच नाही. त्यामुळे सायबर भामट्यांनी फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शहर सायबर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार सायबर भामट्यांसह अज्ञात संशयितांविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे तपास करीत आहेत