नाशिक | प्रतिनिधी | Nashik
तुम्ही तैवान, म्यानमार, जपान आणि अन्य देशांत अनेकदा पाठविलेल्या (कंन्साईनमेंट) कुरिअर पार्सलमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला एमडी ड्रग्ज (Drugs) सापडले आहेत. त्यामुळे तुमच्यावर मनी लॉन्ड्रिगसह देशविघातक कृत्य केल्याचा गुन्हा दाखल झाला असून तुमचे उपलब्ध बँक खाते व त्यातील पैशांची पडताळणी तपास यंत्रणांना करावयाची असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी कोणार्कनगर ६४ वर्षीय सेवानिवृत्तास २७ लाखांचा गंडा घातला आहे. दरम्यान, होम अरेस्टची भीतीसह अन्य धमक्यांचे कॉल येताच नागरिकांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन शहर पोलीस आयुक्तालयाने केले आहे.
आडगाव हद्दीतील (Adgaon Area ) कोणार्कनगर भागात ६४ वर्षीय व्यक्ती कुटुंबासह वास्तव्यास आहे. तो ओझर येथील संरक्षण दलाच्या लिमिटेड कंपनीतून सेवानिवृत्त झाला असून त्याला ३० डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ या चार दिवसांच्या कालावधीत संशयित सायबर चोरट्यांनी व्हॉट्सअॅप व अन्य सोशल मीडियामार्फत ६६२९०२०२९९ आणि ६०२६३०३३५० या क्रमांकांवरुन संपर्क साधला. त्यानंतर, या वयोवृद्धास ‘आम्ही फेडे एक्स कुरिअर कस्टमर केअर व एनसीबी डिव्हिजनमधून सिनिअर एक्झक्युटिव्ह व पोलीस उपअधिक्षक बोलत आहोत’. तुम्ही पाठविलेल्या एका कन्साईनमेंटमध्ये नाकौंटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) एमडीएमए नावाचे ड्रग्ज, आधारकार्ड, कपडे, शूज सापडल्याचे सांगितले.
दरम्यान, कधीही कुठेच कुरिअर वा पार्सल पाठविले नसल्याचे वयोवृद्धाने सांगितले. तरी देखील मोबाइलवरुन बोलणाऱ्या संशयित बनावट अधिकाऱ्यांनी वयोवृद्धास कठोर कारवाईची भीती घालून धमकावले. याबाबत तुमच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हे नोंद झाले असून तपासाचा भाग म्हणूण तुमच्या बँकांतील उपलब्ध पैशांची (Money) पडताळणी करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी इंडसइंड बँक खात्यातून २२ लाख रुपये आणि बँक ऑफ महाराष्ट्राच्या बँक खात्यातून पाच असे २७ लाख रुपये वयोवृद्धास संशयित बँक खात्यात वर्ग करण्यास भाग पाडले. दरम्यान, वयोवृद्धाने अधिक चौकशी केली, असता फसवणूक झाल्याचे समजताच सायबर पोलीस ठाणे (Cyber Police Station) गाठून तक्रार नोंदविली.
अशी होते फसवणूक
सायबर चोरट्यांनी नागरिकांना गंडा घालण्यासाठी अनेक नवीन शक्कल, ट्रिक्स लढविल्या आहेत. यात तुमचे मोबाईल सीमकार्ड दहशतवादी कारवायांसाठी वापरले आहे, असे सांगून कारवाईच्या नावाखाली धमकावून गंडा घातला जातो. तसेच तुम्ही कोट्यवधी रुपयांचे बेकायदेशिर आर्थिक व्यवहार केले आहेत. त्यामुळे तुम्हाला अटक होईल, वॉरंट बजाविले जाईल, असे सांगितले जाते. तर, तुम्ही पाठविलेल्या कुरिअरमध्ये दहशवादाशी निगडित बाबी, पुरावे, तुमचे आधारकार्ड, पॅनकार्ड, एमडी ड्रग्ज, पिस्तूल सापडले आहेत. सीबीआय, एनसीबी, ईडी, क्राईम ब्रान्च तुमच्या घरी येऊन अटक करेन, काखाई क्षीण करण्यासाठी सेटलमेंट करा, पैसे पाठवा असे म्हणून फसवणूक केली जाते.
घाबरुन जाऊ नका
कोणतेही पोलीस दल, केंद्रीय सुरक्षा यंत्रणा नागरिकांना कधीही बँक खात्यात पैसे भरण्यास सांगत नाही. त्यामुळे नागरिकांनी असे काही फोन कॉल्स आले तर समोरच्या संशयितांना ब्लॉक करावे किंवा सायबर पोलिसांशी तत्काळ संपर्क साधावा. आर्थिक व्यवहार करु नयेत. घाबरुन न जाता सायबर पोलिसांना कळवावे.
रियाज शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर, नाशिक