नाशिक | प्रतिनिधी | Nashik
टेलिग्राम व व्हॉटस् अॅपवर ऑनलाईन पार्टटाईम जॉबचे (Part Time Job) आमिष दाखवत छोटचा टास्कसाठी काहीसे पैसे देऊन विश्वास संपादन करत नाशिकमधील चौघा खासगी नोकरदारांची तब्बल ३६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत नाशिक शहर सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा नोंदवण्यात आला असून संशयितांचा शोध सुरू आहे.
सायबर पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीत फिर्यादीच्या मोबाईलवर टेलिग्राम आयडी व व्हॉटस्अॅप क्रमांकावरून पंचवटी, सिडको, नाशिकरोड व इंदिरानगर भागातील चौघा तक्रारदाकांना संपर्क साधण्यात आला. ‘फ्रंट डेस्क ऑफिसर’ आणि ‘सीबीओई टीचर अशी नावे असलेल्या विविध टेलिग्राम व इन्स्टा आयडीवरील संशयितांनी त्यांना घरबसल्या ऑनलाईन कामातून चांगले उत्पन्न मिळेल, असे आमिष दाखवले. सुरुवातीला काही लहान टास्क पूर्ण केल्यावर थोडी सकस खात्यात जमा करून विश्वास संपादन करण्यात आला.
त्यानंतर मोठ्या टास्कसाठी अधिक पैसे (Money) भरण्याचा दबाव टाकत वेगवेगळ्या बँक खात्यांवर रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. या प्रकरणात आयटी अॅक्ट २००० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपासात टेलिग्राम आयडी, व्हॉटस्अॅप क्रमांक आणि संबंधित बँक खात्यांची माहिती संकलित केली जात असून संशयितांची ओळख पटवण्यासाठी कॉल डिटेल्स, आयपी अँड्रेस आणि केवायसी कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार या रॅकेटमध्ये अनेक बोगस खातेदारांचा वापर झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.
पोलिसांनी केले हे आवाहन
सोशल मीडियावरून येणाऱ्या हाय-रिटर्न जॉब ऑफर, टास्क बेस्ड उत्पन्न किंवा क्रिप्टो इन्व्हेस्टमेंटच्या जाहिरातींना भुलूनये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही सक्कम पाठवण्यापूर्वी कंपनीची अधिकृतता तपासावी, अनोळखी लिंकवर क्लिक करू नये आणि संशयास्पद व्यवहार आढळताच १९३० हेल्पलाईन किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.





