नाशिक | प्रतिनिधी | Nashik
व्याजाने (Loan) घेतलेले पैसे परत करण्यासाठी गेलेल्या युवकास अवैध सावकाराने कारमध्ये (Car) डांबून अपहरण (Kidnaping) करत एकलहरे परिसरात नेऊन गावठी कट्ट्याचा धाक दाखवल्याची धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे खंडणी (Ransom) न दिल्यास कुटुंबास जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अवैध सावकारी केल्याप्रकरणात यापूर्वी वैभव देवरे, रोहित कुंडलवाल यांच्यावर कठोर कारवाई झाली असतानाच आता कैलास मैंद पोलिसांच्या रडावर आला आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हा (Case) नोंद आहे.
अवैध सावकार कैलास मैंद, रवी सोळशे व त्यांच्या कारचा चालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. संदीप भास्कर गायकर (३५, रा. नांदगाव बु. ता. इगतपुरी) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांनी संशयित अवैध सावकार कैलास मैंद याच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. २२ जून २०२५ रोजी गायकर हे दुपारी दोनच्या सुमारास व्याजासह दीड लाखांची रक्कम संशयित सावकार मैंदला देण्यासाठी त्याच्या जेलरोड परिसरातील हरिविहार सोसायटीतील कार्यालयात गेले होते. त्यावेळी मैंद व त्याचा साथीदार सोळशे यांनी गायकर यांना गावठी कट्ट्याचा धाक दाखवून जबरीने कारमध्ये बसवले.
कार एकलहरा परिसरातील (Eklahra Area) राखेच्या ढिगाऱ्याजवळील भागात नेली. तेथे संशयितांनी व्याजासह दीड लाखांच्या रकमेव्यतिरिक्त साडेतीन लाखांच्या खंडणीची मागणी केली. खंडणीची रक्कम न दिल्यास गायकर यांना व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि गायकर यांना बेदम मारहाण केली. तपास पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे करत आहेत. तर संशयित मैंद याच्याविरोधात तक्रारदार पुढे येत असून त्याच्याविरोधात तक्रार करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे




