नाशिक | प्रतिनिधी | Nashik
जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) दहा शिक्षण संस्थांत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची (Employees) बोगस भरती करून या शिक्षकांना (Teachers) बनावट कागदपत्रांच्या आधारे शालार्थ आयडी मंजूर करण्याबरोबरच त्यांच्या नावांचा समावेश शासनाच्या ऑनलाईन वेतन प्रणालीत करून त्यांचे वेतन काढून शासनाची आर्थिक फसवणूक (Fraud) केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानुसार, नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दोघा संशयितांपैकी एक अधिकारी डॉ. चव्हाण यांच्या कार्यालयातील वर्ग दोन पदावरील लेखाधिकारी आहे. तर दूसरा संशयित हा जळगाव माध्यमिक वेतन पथक कार्यालयाचा अधीक्षक आहे. या प्रकरणामुळे शिक्षक वर्तुळांत खळबळ उडाली आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील लेखाधिकारी उदयभाई पंचभाई आणि जळगाव माध्यमिक वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा अशी दोघा संशयितांची नावे आहेत. उदय पंचभाई याने आणि जळगाव जिल्हा माध्यमिक वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा यांनी संगनमताने जळगाव जिल्ह्यातील १० शिक्षण संस्थांतील संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक यांच्या संगनमताने उपसंचालक चव्हाण यांना अंधारात ठेवून डिसेंबर २०२३ ते २७ मार्च २०२५ या कालावधीत शिक्षकांचे शालार्थ आयडी परस्पर मंजूर करून त्यांचे दरमहा ४० ते ५० हजार रुपयांचे वेतन देखील अदा केले. या भ्रष्ट कारभारात जळगाव जिल्ह्यात मोठे रकेट कार्यरत असण्याची शक्यता बाढली आहे. या गंभीर प्रकरणात रामकृष्ण पाटील (रा. तरवाडे, ता. अंमळनेर) यांनी पुणे येथील शिक्षण आयुक्तांकडे तक्रार (Complaint) केली होती. या तक्रारीची शहानिशा करण्याचे निर्देश आयुक्तांनी नाशिक विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण याना दिले होते. त्यानुसार चव्हाण यांनी चौकशी समिती गठीत करून हा गुन्हा नोंदविला आहे.
कार्यालयीन वेळ संपताच उद्योग सुरु
जळगाव जिल्हा माध्यमिक वेतन पथक अधीक्षक राजमोहन शर्मा याने विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा लेखाधिकारी उदय पंचभाई याला हाताशी धरून बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षण उपसंचालक चव्हाण यांची मान्यता नसतानाही १० शिक्षण संस्थांतील कर्माचाऱ्यांना शालार्थ आयडी मंजूर केले. विशेष म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांना जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांची वैयक्तिक मान्यता आहे किंवा नाही याचीही खात्री या दोघा संशयितांनी केलेली नव्हती. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या कार्यालयीन वेळेनंतरच्या वेळेतच कर्मचाऱ्यांची ऑनलाईन नोंदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणजे कार्यालयीन कामकाजाची वेळ सहा वाजेची असताना संशयितांनी सहा नंतर उद्योग केले आहेत.
प्रस्तावच नव्हते, या आहेत संस्था
या १० शिक्षण संस्थांतील कर्मचारी शालार्थ आयडी मिळण्याबाबतचे रीतसर प्रस्ताव देखील उपसंचालक कार्यालयाला प्राप्त नव्हते. तरीही उदय पंचभाई याने परस्पर ऑनलाईन ड्राफ्ट भरून इलेक्ट्रोनिक अभिलेख वापरून बनावट शालार्थ आयडी मंजूर करून फसवणूक केली. दरम्यान, भगिनी मंडळ शिक्षण संस्था, अंमळनेर, शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, अंमळनेर, महात्मा फुले शिक्ष संस्था, टाकरखेडा, ता. अंमळनेर, ग्रामीण विकास विद्या प्रसारक संस्था, एरंडोल, २. ची. पाटील बहुशिक्षण संस्था, वावडे, शिवाजी शिक्षण संस्था, कासोदा, सर्वोदय शिक्षण संस्था, सिंधगव्हान, बेलगंगा शिक्षण संस्था, चाळीसगाव, नूतन मराठा शिक्षण संस्था, जळगाव, प. पु. माधव सदाशिक गोळवलकर गुरुजी सार्वजनिक संस्था, कु-हा अकाकोडा, ता. मुक्ताईनगर अशी शिक्षण संस्थांची नावे आहेत.
मुद्दे
- नाशिक शिक्षण विभागातील भ्रष्ट कारभार उघड
- सुनीता धनगर, डॉ. वैशाली वीर या अधिकाऱ्यांना लाच स्वीकारतांना पकडले होते
- शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेत गैरव्यवहार
- याच आरोपाखाली नाशिक मनपाचे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांची गच्छंती
- वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच बनावट शालार्थ आयडी मंजूर केले
- शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान