नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कोविड काळात नाशिक जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालयातील आयसीयू (अतिदक्षता कक्ष) उभारण्यात कोट्यवधींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटकेनंतर तुरुंगात असलेले जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे (Dr.Nikhil Saindane) यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. डॉ. सैंदाणे दोन आठवड्यांपासून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. आता त्यांचा मुक्काम आणखी वाढला आहे.
कोविड काळातील (Corona) आर्थिक गैरव्यवहार करीत शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल आहे. डॉ. सैंदाणे यांना याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी १२ जानेवारी रोजी विनयनगर येथील घरातून अटक केली होती. १३ तारखेला न्यायालयाने (Court) त्यांना पोलिस कोठडी सुनावली. त्यानंतर कोठडीची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे त्यांची नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी झाली.
दरम्यान, डॉ. सैंदाणे यांनी न्यायालयाकडे जामीनासाठी (Bail) अर्ज केला असता, त्यावर दोन्ही बाजूचा युक्तिवाद जिल्हा व सत्र न्यायालयात झाला. त्यावरील निर्णय राखून ठेवत शनिवारी (दि. २४) न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला.




