नाशिक | प्रतिनिधी | Nashik
एमएसईबीमध्ये चारचाकी वाहन कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर लावून देतो, असे आमिष दाखवून एका वाहन चालकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकरोड येथील जेलरोड परिसरात (Jail Road) उघडकीस आला आहे. याप्रकरणी राजेंद्र भिका खैरणार (रा. जेलरोड, नाशिकरोड) याच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात (Nashik Road Police Station) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनोज भगतसिंग थेटे (वय ४६, रा. दसक गाव, महालक्ष्मीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या मालकीची होंडा अमेझ (०१ ६२९४) ही चारचाकी गाडी असून ती ते भाड्याने चालवत होते. दरम्यान, राजराजेश्वरी, जेलरोड येथे त्यांची ओळख राजेंद्र खैरणार याच्याशी झाली. खैरणार याने स्वतःची शासकीय अधिकारी तसेच राजकीय नेत्यांशी ओळख असल्याचे सांगत विविध संघटनांची ओळखपत्रे दाखवून फिर्यादीचा विश्वास संपादन के ला. एमएसईबीमध्ये वाहन कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर लावून देतो, असे सांगत त्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली.
त्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने टप्प्याटप्प्याने १५ हजार रुपये रोख व ५ हजार रुपये फोन पेद्वारे दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतर आरोपीने काम न करता वारंवार उडवाउडवीची उत्तरे दिली. पुढे वाहन जुने असल्याचे सांगून नवीन सात सीटर गाडी घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार फिर्यादीने किआ कॅरेन्स ही नवीन गाडी खरेदी केली. तरी देखील आरोपीने एमएसईबीमध्ये वाहन लावून न देता फसवणूक (Fraud) केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, मित्रांच्या मदतीने चौकशी केली असता आरोपीकडे विविध संघटनांची खोटी ओळखपत्रे असून तो सरपंच व पदाधिकारी बनून अनेक नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली. यावरून आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर फिर्यादीने नाशिकरोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.





