नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik
जेलरोड (JailRoad) येथील मंगलमूर्तीनगरमध्ये एका बंगल्यात अज्ञात चोरट्याने बंद दरवाजाचे कडीकुलूप तोडून सुमारे २२ तोळे सोन्याचे तर दीड किलो चांदीचे व रोख रक्कम दहा हजार रुपये असा सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात (Upnagar Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा करण्यात आला आहे.
या संदर्भात वैशाली किशोर मैंद (वय ४५, रा. गौरी मंगल सोसायटीजवळ मंगलमूर्तीनगर) यांनी उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद (FIR) दिली. त्यात म्हटले आहे की, गुरुवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास त्यांच्या नातेवाईकांकडे जेवणासाठी गेले होते. जेवण करून रात्री सव्वा अकराच्या दरम्यान घरी परतले तेव्हा घराचा कडीकुलूप तोडलेले आढळून आले. तसेच घरातील कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या व कपाटातील मुख्य लॉकरमधून सुमारे बावीस तोळे सोन्याचे दागिने व दीड किलो चांदीचे दागिने त्यात गणपती उत्सवाकरिता केलेले आभूषणे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.
दरम्यान, या घटनेची माहिती उपनगर पोलिसांना (Police) माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, अधिकारी व कर्मचारी यांनी धाव घेतली. त्यानंतर आयुक्तालयातील श्वानपथक व फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी येऊन चोरट्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.




