नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शहरात नुकताच एक गंभीर स्वरुपाचा सायबर गुन्हा (Cyber Crime) नाेंद झाला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कळवणमधील तीन तरुणींना वनखात्यातील (Forest Department) नाेकरीचे आमिष दाखवून त्यांचे फाेटाे व बायाेडाटा मागवून घेत दाेघा इन्स्टा आयडीधारकांनी त्यावरुन फाेटाे ‘माॅर्फ’ करुन व्हायरल करीत खंडणी उकळली आहे. भेदरलेल्या या मुलींनी शहर सायबर पाेलीस ठाणे गाठून दाेघां आयडींविराेधात फिर्याद नाेंदविली असून आता तांत्रिक विश्लेषणानुसार सखाेल तपास सुरु झाला आहे.
याबाबत अधिक माहिती की, तिन्ही पीडित तरुणी या कळवण परिसरातील (Kalwan Area) वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या असून त्या शिक्षणासह स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी काही महिन्यांपासून नाशिक शहरात एकत्रितपणे भाडेतत्तवावर राहतात. हीच तयारी करत असताना, त्यांना ३ ते ५ डिसेंबर या दाेन दिवसांच्या कालावधीत कल्पेश_गिरंधले आणि ओ लव्ह_39_मा/ या दाेन इन्स्टासह इतर साेशल मिडीया अकाउंटवरुन मेसेज आले. प्रारंभी या संशयितांनी मुलींना विश्वासात घेऊन थेट वनखात्यात ‘वनरक्षक, तसेच रेंजरपदावर नेमणूक देऊ’ असे आमिष दाखविले.
मुली (Girl) काहीशा भाळल्याने त्यांनी संशयितांशी ‘चॅटिंग’ सुरु ठेवले. त्याचवेळी दाेघांनी मुलींचे माेबाईल नंबर मागवून घेत त्यावरुन संपर्क साधत नाेकरीसाठी आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, फाेटाे व बायाेडाटा मागवून घेतले. त्यानंतर, काही तासांनी संशयितांनी तरुणींचे माॅर्फ फाेटाे त्यांना पाठविले. अश्लिल व नग्न फाेटाे पाहून तरुणींच्या पायाखालची जमीन सरकली. त्यातच संशयितांनी दाेन्ही मुलींकडे असेच ‘ओरिजनल’ फाेटाे पाठविण्याची धमकी दिली. त्यानंतर दाेन्ही आयडीधारकांनी हे फाेटाे साेशल मिडीयावर व्हायरल करीत धमकी दिली.
नाहीतर पाेस्टर लावू…
हा सर्व प्रकार घडत असताना दाेन्ही संशयितांनी तरुणींकडून पाचशे रुपये ऑनलाइन मागवून घेतले. यावरच न थांबता खरेखुरे अश्लिल फाेटाेंची मागणी करीत ते न दिल्यास माॅर्फ फाेटाेंचे ‘पाेस्ट’ छापून ते संपूर्ण नाशिक शहरात लावण्याची धमकी दिली. अश्लिल शिवीगाळ करीत खंडणी मागितली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे करत आहेत.
मुद्दे
- संशयित अकाऊंटधारक स्थानिक किंवा ओळखीतील
- नाेकरीच्या आमिषाला तरुणी बळी पडल्या
- तत्काळ सावधानता बाळगल्याने पुढील अनर्थ टळला
- दाेन्ही आयडी वापरणारा संशयित एकच असण्याची शक्यता
- कुणालाही वैयक्तिक कागदपत्रे, फाेटाे सेंट करु नये
- अनाेळखी मेसेजला रिप्लाय करणे टाळावे




